अभिनेते प्रकाश राज हे कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या तीन वर्ष जुन्या ट्विटवरून गोंधळ निर्माण झाला आहे. शशांक झा नावाच्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलाने तामिळनाडू पोलिसांना टॅग करत प्रकाश राज यांच्या जुन्या ट्वीटची आठवण करून दिली आहे. इतकंच नाही तर त्यांनी “प्रकाश राज यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे का?” असा प्रश्नदेखील विचारला आहे.
याबरोबरच या ट्वीटमध्ये अभिनेत्याचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये प्रकाश राज यांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला आहे. ज्यावर कन्नड भाषेत लिहिले आहे की “मला हिंदी येत नाही, जा….!” आता यावरूनच निर्माण झालेल्या जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे. प्रकाश राज यांनीही या ट्वीटला प्रत्युत्तर दिले. हे ट्विट रिट्विट करत त्यांनी इंग्रजी आणि कन्नड भाषेत लिहिले की, “माझी मूळ मातृभाषा कन्नड आहे. जर तुम्ही त्याचा अपमान केला, त्याचा आदर करणार नाही. आणि तुमची भाषा आमच्यावर लादली तर मी असाच विरोध करत राहीन. तुम्ही मला धमकावत आहात का? सहज विचारले.”
आणखी वाचा : राणी मुखर्जीला आवाजावरुन केलं जायचं ट्रोल; त्या अनुभवाबद्दल अभिनेत्री म्हणते, “लोकांचं ऐकलं असतं तर…”
माहितीसाठी सांगायचं झालं तर प्रकाश राज यांनी हे ट्विट तीन वर्षांपूर्वी १३ सप्टेंबर २०२० रोजी हिंदी दिवसानिमित्त केले होते. जे शेअर करत त्यांनी लिहिले की “मला अनेक भाषा येतात. अनेक भाषांमध्येही काम करता येते. पण माझी शिकवण, माझी श्रद्धा, माझे मूळ, माझी शक्ती, माझा अभिमान, माझी मातृभाषा कन्नड आहे.”
इतर राज्यांतील कलाकारांनी त्यांच्यावर हिंदी लादली जात असल्याचा आरोप केला होता. त्याविरोधात काही कलाकारांनीही आवाज उठवला होता ज्यात प्रकाश राज, धनंजय आणि वशिष्ठ एन सिम्हा यांचा समावेश होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपले मत ठामपणे मांडले होते. आता तीन वर्षांपूर्वी प्रकाश राज यांच्या त्या ट्वीटविरोधात तक्रार नोंदवण्याची मागणी केली जात आहे.