साठ ते सत्तरच्या दशकात लिहिलेल्या एका पात्राची गोष्ट त्याच्या भावविश्वासह चाळीस-पन्नास वर्षांनंतर ओटीटी सारख्या नवमाध्यमावर वेबमालिकेच्या स्वरूपात पाहताना त्याच्या प्रेमात पडावं, असा मॅड अनुभव ‘लंपन’ पाहताना येतो. प्रकाश नारायण संतांच्या लेखणीतून उतरलेल्या लंपनचं निरागस भावविश्व तितक्याच नितळ, तरलतेने पडद्यावर उतरलं आहे. लंपनची ही गोष्ट आजच्या पिढीलाही सहज भावते ही त्या लेखकाची ताकद खरीच… मात्र लेखकाने उभं केलेलं शब्दचित्र त्यातल्या भावविश्वाला कुठेही धक्का न लावता त्याच सुंदरतेने, सहजतेने पडद्यावर आणण्याचं श्रेय दिग्दर्शक निपुण अविनाश धर्माधिकारी आणि त्यांच्या चमूला आहे.

मूळचे बेळगावचे असलेल्या प्रकाश नारायण संतानी १९६४ साली पहिल्यांदा लंपन या त्यांच्या मानसपुत्राची कथा ‘वनवास’ या नावाने ‘सत्यकथे’त प्रसिद्ध केली. त्यामुळे या कथेचा काळच खूप जुना किंबहुना आत्ताच्या नव्या पिढीला कथा-कादंबऱ्यांमधूनही फारसा परिचित नसलेला. याच ‘वनवास’ कथेवर आधारित ‘लंपन’ ही निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित आणि चिन्मय केळकर लिखित सात भागांची वेबमालिका सोनी लिव्ह वाहिनीवर प्रदर्शित झाली आहे. अत्यंत साधी सोपी सरळ कथा. लंपनच्या इच्छेविरुद्ध त्याला त्याच्या आईवडिलांनी बेळगावला गुंडीमठ येथे आजी-आजोबांकडे राहायला पाठवलं आहे. गावाची सवयच नसलेल्या लंपनला तिथली शाळा, तिथली माणसं यांच्याशी जुळवून घ्यायची मुळातच इच्छा नाही आहे. सुरुवातीला येणारी आईची आठवण, तिचं आजूबाजूला नसणं यामुळे सतत एकटेपणाच्या जाणिवेने घेरलेल्या लंपनच्या डोक्यात सतत काही ना काही विचारांची चक्रं सुरू असतात. लंपनचे आजोबा मोठे पुरातत्त्व संशोधक आहेत. त्याच्या आजीच्या भाषेत ते विद्वान आहेत त्यामुळे कधी कधी ते त्यांच्या अभ्यास – संशोधनात इतके हरवून जातात की त्यांना आजूबाजूचं भानच उरत नाही. लंपनची आजी व्यावहारिक आहे, तरीही मनाने प्रेमळ आहे. या सगळ्यात लंपनला आधार मिळतो तो बाजूच्या सुमीचा. त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू असतं याची जाणीव आजीनंतर फक्त सुमीला आहे. मात्र नेमकं तो कसला विचार करत असतो हे त्यांनाही माहिती नाही. सुरुवातीला एकटा असलेला आणि हळूहळू सगळ्या गावाचा लाडका झालेल्या लंपनची, त्याच्या मोठं होत जाण्याची ही गोष्ट आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
According to actor Prathamesh Parab nothing will work in the name of comedy
‘विनोदाच्या नावाखाली काहीही चालणार नाही’
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Hindi cinema Director abhinaya dev Savi movie
चोखंदळ दिग्दर्शक
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

हेही वाचा >>>‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची झाली फसवणूक, संतप्त विदिशाने पोस्ट करत कलाकारांना केली ‘ही’ विनंती

आपण कोण, आपले आई-वडील कोण, स्वत:ची ओळख, जगाची पारख मुलांना हळूहळू रोजच्या घटनांमधून होत जाते. अगदी बारीकसारीक गोष्टीतून ते आपल्याबरोबर घडणाऱ्या घटनांचा माग घेतात, घडलं आहे त्यावर विचार करत राहतात, स्वत:ला आणि इतरांना प्रश्न विचारून भंडावून सोडतात. त्यातून मिळणाऱ्या उत्तरातून आपल्या मनात आपला विचार पक्का करत जातात. हे सगळंच लंपनच्या बाबतीतही घडतं. लहान मुलांच्या दृष्टिकोनातून दिसणारं जग हे जसं या कथेचं वैशिष्ट्य, तसंच त्या काळातील माणसं, कानडी हेल असलेली मराठी भाषा, शहरीकरणाचा जराही स्पर्श नसलेलं गुंडीमठ हे सुंदर गाव, तिथली शाळा, मातीत रमणारी मुलं, एकमेकांशी अगदी घट्ट प्रेमाने जोडून घेण्याची या मुलांची सहजता अशा कित्येक गोष्टी दिग्दर्शकाने सुंदर चित्रासारख्या रंगवल्या आहेत. या मालिकेतील संवाद हेही खास ठेवणीतले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कित्येक मराठी शब्द, म्हणी, कथेच्या ओघाने येणारी गाणी परिचयाची नसली तरी कानाला गोड वाटतात. चिन्मय केळकर यांनी या संवादातून भाषेचा गोडवाही जपला आहे आणि परिचयाची नसली तरी ती क्लिष्ट वाटणार नाही याचंही भान त्यांनी ठेवलं आहे. त्यामुळे चित्रपटातील संवादही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात.

उत्तम कथा आणि दिग्दर्शकीय मांडणी असली तरी कथेबरहुकूम त्या पात्रांमध्ये रंग भरण्यासाठी त्या ताकदीचे कलाकारही असले तर खरी मजा येते. इथे लंपनच्या मुख्य भूमिकेत असलेल्या मिहिर गोडबोले या बालकलाकाराबरोबरच त्याचे आई-बाबा, आजी-आजोबा, बाबुराव, लंपनची मैत्रीण सुमी अशा प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यक्तिरेखेतील कलाकाराने खूप सहजतेने आणि अप्रतिमपणे आपल्या भूमिका केल्या आहेत. मिहिरच्या चेहऱ्यातील विलक्षण गोडवा आणि त्याने लंपनच्या भूमिकेसाठी स्वीकारलेली देहबोली, संवादफेकीची त्याची अनोखी पद्धत यामुळे लंपन सगळ्यांचं मन जिंकून घेतल्याशिवाय राहात नाही. अवनी भावेने साकारलेली त्याची मैत्रीण सुमीही खास आहे. लंपनच्या आजोबांच्या भूमिकेत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना अभिनय करताना पाहणं हा सुखद धक्का आहे. तर लंपनची प्रेमळ, हुशार आजी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी त्यांच्या खास शैलीत रंगवली आहे. त्याच्या आईच्या भूमिकेत कादंबरी कदम, वडिलांच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर हे छोटेखानी भूमिकेतही भाव खाऊन जातात. ‘लंपन’ पाहताना ‘मालगुडी डेज’ची आठवण येते खरी… मात्र त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी अशी ही मालिका आहे. या मालिकेचा सगळा जोर लंपनवरच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मिहिर गोडबोलेने ही मालिका पूर्णपणे उचलून घेतली आहे. पण केवळ अभिनयातूनच नव्हे तर या मालिकेसाठी निवडण्यात आलेली जागा, लंपनच्या आजी-आजोबांच्या घर, त्यांचं अंगण, अंगणातला झाडाला लावलेला झोका ते गावची नदी, शाळेचा परिसर अशा कित्येक सुंदर जागा छायाचित्रणकार अमेय चव्हाण यांच्या कॅमेऱ्यातून अधिक बोलक्या झाल्या आहेत.

हेही वाचा >>>पाकिस्तानी अभिनेत्रीने भारतीय रॅपर बादशाहला डेट करण्याबाबत सोडलं मौन; म्हणाली, “मला वाटतं की आमच्यात…”

लंपनचं निरागस भावविश्व जसं आपल्याला त्याच्या प्रेमात पडायला लावतं, तितकीच त्याच्या अवतीभवती असलेल्या माणसांची, त्यांच्या विश्वाची ही नितळ, नदीच्या पाण्यासारखी पारदर्शी गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळते. इतकं सुंदर भावविश्व प्रत्यक्ष अनुभवायला मिळणं तसं कठीणच. त्यामुळे एखादी सुंदर सचित्र कादंबरी पाहताना मन जसं इवल्या इवल्या आनंदाने भरून जातं तसाच मॅड आनंदाचा अनुभव ‘लंपन’ पाहताना येतो.

लंपन

दिग्दर्शक – निपुण अविनाश धर्माधिकारी

कलाकार – मिहिर गोडबोले, अवनी भावे, चंद्रकांत कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, कादंबरी कदम.