बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान हा इतर खान कलाकारांपेक्षा अनेक गोष्टींमुळे वेगळा ठरतो. आमिर कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला जात नाही तसेच तो आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीकरिताही कोणत्याच शोमध्ये जात नाही. तो वेगळ्या पद्धतीने आणि हटके अंदाजात त्याच्या चित्रपटांची प्रसिद्धी करतो. आमिर एक संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जातोच पण एक जागरुक नागरिक म्हणूनही त्याच्याकडे बघितले जाते. यामुळेच त्याने आता एक पाऊल पुढे जात स्वतःसाठी तयार केलेला एक नियम मोडला आहे. नुकताच आमिरचा ५२ वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यादिवशी त्याने चक्क एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावली होती. महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्ध असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात आमिर त्याच्या पत्नीसह उपस्थित होता.
आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आले होते. पण ही सेलिब्रिटी जोडी आमिरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी किंवा त्याच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तेथे गेले नव्हते, तर ‘पाणी फाउंडेशन’ या त्यांच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी तेथे गेले होते. दरम्यान, प्रसिद्धीसाठी कोणत्याही कार्यक्रमात हजेरी न लावण्याचा नियम एकाएकी आमिरने मोडला तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याविषयी आमिर म्हणाला की, एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये जाण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आम्ही जे काम करण्याचा प्रयत्न करतोय ते महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरांत बघितला जातो. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्हाला एक मंच मिळाला. यामुळे ‘पाणी फाउंडेशन’ची माहिती महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक या उपक्रमात सहभागी होतील, असे मला वाटते. महाराष्ट्रातील जनता कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करते. येथील प्रत्येक गावात आणि गावकऱ्यांत कठीण परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे आणि यामुळेच दुष्काळाच्या संकटावरसुद्धा हे गावकरी एकत्र येऊन मात करतील, असा विश्वासही आमिरने यावेळी व्यक्त केला. किरणलाही ‘चला हवा येऊ द्या’मधील छोट्या छोट्या स्किट्स पाहण्यात खूप मजा आल्याचे तिने सांगितले.
महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती बघता भविष्यात उदभवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमिर खान आपल्या ‘पाणी फाउंडेशन’ या संस्थेद्वारे छोट्या छोट्या गावांमध्ये काम करतो आहे. गेल्यावर्षी तीन तालुक्यांमधील गावांमध्ये त्याने ‘वॉटर कप स्पर्धेचं’ आयोजन केलं होतं. या स्पर्धेला गावांगावांमधून मिळालेला उत्तम प्रतिसाद बघता यावर्षी ‘पानी फाउंडेशन’ तीस तालुक्यांमधील हजारो गावांमध्ये जाऊन तेथील गावकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. याच प्रकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी आमिर खान आपली पत्नी किरण रावसह या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याच्यासोबत ‘पानी फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आणि ज्येष्ठ पाणीतज्ज्ञ तथा प्रकल्प संचालक डॉ. अविनाश पोळ हे देखील उपस्थित होते.