९०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘दिल’ चित्रपटामुळे बॉलीवूडला आमिर खान आणि माधुरी दीक्षित ही हिट जोडी मिळाली. त्यावेळी आमिरला चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्धी देणा-या दिलचा रिमेक तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात आमिर खानही काम करण्याची शक्यता आहे.
‘दिल’ चित्रपटाचे निर्माता इंद्र कुमार यांनी माध्यमांशी बोलताना एकदा म्हणाले होते की, मी ‘दिल २’ चित्रपट बनवणार. मात्र, यात मी आमिरला घेणार नाही. कारण, आता तो त्या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही. चित्रपटासाठी आम्ही हिरोचा शोध घेत आहोत. पण आता इंद्र यांनी आमिरला चित्रपटात घ्यायचे ठरवले आहे. चित्रपटात आमिरची भूमिका नेमकी काय असेल याबाबात कोणताही खुलासा झालेला नाही. एका संकेतस्थळानुसार, आमिर ‘दिल २’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार नाही. पण, तो चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावेल. यासाठी आमिरने होकार दिल्याचेही कळते.