आमिर खानचे स्पष्टीकरण; केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा दावा फोल
गेली दहा वर्षे ‘अतुल्य भारत’ मोहिमेचा सदिच्छादूत म्हणून काम केलेल्या आमिर खानला या मोहिमेच्या सेवेतून मुक्त करताना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने संबंधित जाहिरात कंपनीकडे बोट दाखवले आहे. जाहिरात कं पनीने आमिरबरोबर या मोहिमेसाठी केलेला आर्थिक करार संपुष्टात आल्याचे कारण कें द्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी दिले होते. मात्र, दस्तुरखुद्द आमिर यानेच आपण या मोहिमेसाठी विनाशुल्क काम केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याची पुस्तीही त्याने जोडली आहे.
परदेशातील पाहुणे भारतात आल्यानंतर त्यांना मिळणारी वागणूक यावर आधारलेल्या ‘अतुल्य भारत’ या मोहिमेचा आमिर खान गेली दहा वर्षे सदिच्छादूत म्हणून काम करत होता. केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे ही मोहीम राबवण्यात आली होती. मात्र, अलीकडेच झालेल्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कार सोहळ्यात आमिरने देशातील वाढत्या असहिष्णू वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर देशभर गदारोळ उडाला. आमिरच्या याच वक्तव्यामुळे त्याला सदिच्छादूताच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याची टीका होत आहे. पर्यटन मंत्रालयाने मात्र आमिरच्या गच्छंतीबाबत जाहिरात कंपनीला जबाबदार ठरवत कानावर हात ठेवले आहेत. गुरुवारी आमिरने यासंदर्भात आपले मौन सोडताना सरकारच्या या निर्णयाबद्दल आपल्याला आदरच असल्याचे म्हटले आहे. देशासाठी जे काही सामाजिक कार्य करायचे असेल त्यासाठी आपण यापुढेही तत्पर राहू. ‘अतुल्य भारत’ची जबाबदारीही आपण याच सामाजिक भावनेतून घेतली होती आणि आत्तापर्यंत ज्या लोकोपयोगी अभियानासंदर्भातील फिल्म्स केल्या त्यासाठी आपण एकही पैसा घेतला नसल्याचे आमिरने स्पष्ट केले.
कोणत्याही सरकारी उपक्रमासाठी सदिच्छादूत कोण असावा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे त्यांनी मला या सेवेतून मुक्त करायचा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाबद्दल आदर आहे. दहा वर्षे ‘अतुल्य भारत’ उपक्रमाशी जोडले गेल्याबद्दल आनंद आहे. भारत अतुल्य आहे आणि तो तसाच कायम राहील.
आमिर खान, अभिनेता