छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये जाऊन आपल्या सिनेमाचे प्रमोशन करणे हा तर आता ट्रेण्डच बनला आहे. शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत प्रत्येकजण आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी छोट्या पडद्याची मदत घेतात. यात खरे तर दोघांचाही फायदा असतोच. एक तर त्या शोलाही प्रसिद्धी मिळते आणि सिनेमाचेही प्रमोशन होतेच. ‘द कपिल शर्मा शो’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी नाइट्स से बचाओ’ यांसारख्या शोमध्ये कलाकार आपल्या सिनेमाचे प्रमोशन करायला जातात.
पण या ट्रेण्डला छेद देणार तो म्हणजे आमिर खान. आमिरने स्पष्ट केले आहे की, त्याचा आगामी सिनेमा दंगल याच्या प्रमोशनसाठी तो बिग बॉसमध्ये जाणार नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना आमिर म्हणाला की, मी प्रमोशनसाठी टीव्हीवर जाणार नाही.
https://www.instagram.com/p/BNYZLljBTlL/
सलमान खानचा शो ‘बिग बॉस १०’ बद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला की, ‘सिनेमाचा ट्रेलर आणि प्रोमो दाखवले जातील. पणतो स्वतः बिग बॉस १० मध्ये जाणार नाही.’ आमिर खानची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘दंगल’ येत्या २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या या सिनेमाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. या सिनेमाची कथा हरियाणाचे कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. महावीर यांना देशासाठी पदक मिळवून देण्यासाठी मुलगा हवा होता. पण त्यांना चारही मुलीच होतात. पण ते त्यांच्या गीता आणि बबिता या मुलींना कुस्तीपटू बनवतात आणि देशासाठी सुवर्ण पदक मिळवून देतात. यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये गीताचे लग्न झाले. या लग्नाला आमिर खाननेही आवर्जुन हजेरी लावली होती. गीता फोगट ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू आहे जी ऑलम्पिकमध्ये सहभागी झाली. याशिवाय तिने देशाला पदकही मिळवून दिले. २० नोव्हेंबरला तिने पवनकुमार या कुस्तीपटूशी विवाह केला. तिचे हे लग्न तिच्याच गावी बलालीमध्ये झाले. या लग्नाला आमिर खान, साक्षी तन्वर, गीता आणि बबिता बनलेल्या अभिनेत्री उपस्थित होत्या.