प्रसिद्ध कलाकारांवरची टीका, सेलेब्रिटी पाटर्य़ामधील बेशिस्त वर्तन, खळबळजनक मुलाखती आणि बिनधास्त जीवनशैली यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या हॉलीवूड सेलेब्रिटी आरोन कार्टरला पोलिसांनी अटक केली. दारू पिऊन नियमबाह्य़ पद्धतीने गाडी चालवणे आणि स्वत:जवळ अमली पदार्थ बाळगणे या गुन्ह्य़ांसाठी त्याला अटक झाली होती. परंतु अटकेनंतर थोडय़ाच वेळात त्याला जामिनावर सोडण्यात आले. पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर लगेचच त्याने एक पत्रकार परिषद घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो अमली पदार्थाचे सेवन करत नाही. त्या दिवशी, ट्रॅफिक पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्याने तपासासाठी योग्य ते सहकार्य त्यांना केलं. तरीही पोलिसांनी त्याच्यावरती गैरवर्तणुकीचे आरोप केले. एवढेच नाही आपल्या गाडीत सापडलेले अमली पदार्थ कुठून आले हेही आपल्याला माहीत नसल्याचे त्याने म्हटले आहे. पोलिसांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी तो वैद्यकीय तपास करण्यासाठीसुद्धा तयार आहे. मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून त्याला अटक केली आहे, असा उलटा आरोप त्याने पोलिसांवरच केला आहे. यावर पोलिसांनीही एक पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. त्यांच्या मते नियम हे सर्वासाठी समान असतात. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना काही अधिकार देण्यात आले आहेत, परंतु पोलिसांना आपल्या मर्यादांची जाणीव असून ते अधिकारांचा गैरवापर करत नाहीत.

https://twitter.com/aaroncarter/status/887094550191362048

आरोन कार्टर हा प्रतिष्ठित व्यक्ती असला तरी देखील त्याला त्याच्या गुन्ह्य़ांची शिक्षा मिळणारच. पोलिसांवर त्याने केलेले आरोप खोटे असून लवकरच त्याचे गुन्हे न्यायालयात सिद्ध होतील. आणि त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेल, अशी आक्रमक भूमिका घेत पोलीसही त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी कसून कामाला लागले आहेत. एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा खऱ्याखोटय़ाचा खेळ सध्या कार्टरमुळे वास्तवात पाहायला मिळतो आहे.