बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि आयुष शर्माचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण आता आयुषने या चित्रपटात सलमानसोबत काम करायचे नव्हते असे म्हटले आहे.
आयुषने नुकतीच न्यूज १८ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने जर सलमानसोबत काम केले तर घराणेशाही हा वाद सुरु होईल अशी भीती व्यक्त केली होती. ‘या चित्रपटाच्या निर्मिती वेळी मी खूप नर्वस होतो. कारण माझ्यासोबत सलमान काम करणारा होता. त्यामुळे अनेक चर्चेचे विषय ठरु शकतात असे मला वाटत होते. आम्ही एकाच घरातले. तो माझी मदत करण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. तसेच घराणेशाहीचा मुद्दा समोर आला असता’ असे आयुष म्हणाला.
पुढे तो म्हणाला, ‘मला सलमानसोबत काम करायचे नव्हते आणि मी त्याला देखील हे सांगितले होते. मी संपूर्ण कुटुंबीयांना सलमानला या चित्रपटात काम करु नको असे सांगायला सांगितले होते. सलमान चित्रपटात असल्यामुळे मी चांगले काम करु शकेन की नाही अशी चिंता मला सतावत होती. तो चित्रपटात असला की स्क्रीनवर जणू काही जादू करतो. त्यामुळे मी स्क्रीनवर चांगला दिसेल की नाही याचा विचार मी सतत करत होतो. पण सलमानने मला समजावले.’
यावर सलमानने आयुषला समजावले होते. तो म्हणाला, ‘आयुष तुला तुझ्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत करायला हवे. तुला लोकांना समजून घ्यायला हवे. तुला तुझ्या अभिनयाने सर्वांची मने जिंकायला हवीत.’
‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.