श्रद्धांजली, सौजन्य –
दीप्ती नवल
प्रसिद्ध अभिनेते फारुख शेख यांचे नुकतेच निधन झाले. चष्मेबद्दूर, कथा, साथ-साथ अशा सिनेमांमधून त्यांच्याबरोबर नायिकेची भूमिका केलेल्या त्यांच्या सहयोगी अभिनेत्री दीप्ती नवल यांनी आपल्या या सहकाऱ्याच्या आठवणी जागवल्या आहेत.
फारुख शेख यांच्याबरोबरची पहिली मीटिंग मला अजूनही आठवते. ते वर्ष होतं १९७५. माझं पदवीपर्यंतचं शिक्षण संपवून मी न्यूयॉर्कहून नुकतीच परतले होते आणि अभिनेत्री म्हणून करियर सुरू करण्यासाठी चांगल्या संधीच्या शोधात होते. दूरदर्शनच्या ऑफिसमध्ये मला प्रॉडक्शन टीमला भेटायला बोलावलं होतं. फारुख शेखही तिथे आले होते. खरं तर आम्ही दोघांनी मिळून एक शो करावा यासाठी आम्हाला दोघांनाही तिथे प्रॉडक्शन टीमला भेटायला बोलावलं होतं. तिथे झालेली ती आमची पहिली भेट. खरं तर तो एक छोटासा एका भागाचा कार्यक्रम होता. पण त्याने माझ्या पुढच्या जवळजवळ ३८ वर्षांच्या रुपेरी पडद्यावरच्या कारकिर्दीची सुरुवात करून दिली.
या कार्यक्रमाच्या दरम्यान मी आणि फारुख शेख एकदम झटकन एकमेकांशी जोडले गेलो. फारुख शेख अनुभवी अभिनेते होते आणि चांगलेच लोकप्रियदेखील होते. गरम हवा (१९७३) आणि मेरे साथ चल (१९७४) असे त्यांचे दोन सिनेमे आलेले होते. ते पीडीए म्हणजेच पीपल्स थिएटर असोसिएशनशीही जोडलेले होते. तरीही ते अगदी साधे होते. त्यांच्या डोक्यात कसलीही हवा गेलेली नव्हती. त्यांच्याशी सहजपणे संवाद होऊ शकायचा एवढे ते जमिनीवर होते. मी चांगली अभिनेत्री बनू शकते, असं त्यांनी मला ठामपणे सांगितलं. माझ्या अभिनयक्षमतेवर त्यांनी जो विश्वास दाखवला, त्यामुळे माझा आत्मविश्वास एकदम वाढला. एक बार फिर (१९८०) या सिनेमासाठी तर त्यांनीच माझं नाव दिग्दर्शक विनोद पांडे यांना सुचवलं. तो माझा फारुख शेख यांच्याबरोबरचा पहिला सिनेमा ठरला असता, पण त्यांचं त्याच वेळी नूरी सिनेमाचंही शूटिंग सुरू होतं. या दोन्ही सिनेमांच्या शूटिंगच्या तारखा क्लॅश होत होत्या.
सगळ्यात पहिल्यांदा सई परांजपे यांनी ‘चष्मेबद्दूर’ (१९८१) सिनेमात आम्हाला एकत्र पेश केलं. त्या सेटवर मला राकेश बेदी आणि रवी वासवानी हे दोघंही भेटले. त्यांच्यामुळेच नंतर सतीश शहा आणि रमण कुमार यांच्याशीही ओळख झाली. आमची सगळ्यांची मस्त भट्टी जमली आणि छान ग्रुप तयार झाला. रूपा वकील म्हणजे फारुख शेख यांची तेव्हाची मैत्रीण आणि नंतर बायकोही आमच्या या ग्रुपमध्ये सामील झाली. हे सगळेच जण विशेषत: फारुख आणि रूपा भेटले नसते तर मला फिल्मी दुनियेशी जमवून घ्यायला कितपत जमलं असतं कुणास ठाऊक!
फारुख शेख आणि मी आम्ही दोघांनी मिळून कितीतरी सिनेमे केले आहेत. उदाहरणच द्यायचं तर ‘कथा’ (१९८३), ‘किसी ने ना कहा’ (१९८३), ‘रंगबिरंगी’ (१९८३). आमचे कित्येक सिनेमे तर भारतीय चित्रपटाच्या वाटचालीत लक्षणीय ठरले आहेत. (अर्थात आम्हाला ही गोष्ट नंतर जाणवली.) फारुख शेख यांच्याबरोबर काम करणं हे एकदम नो टेन्शन टाइपचं असायचं. कारण एकतर ते सतत समोरच्याला सांभाळून घ्यायचे, प्रोत्साहित करायचे. त्यामुळे आमची पडद्यावरची केमिस्ट्रीही एकदम मस्त जुळून यायची. आम्ही रमन यांचा ‘साथ साथ’ (१९८२) सिनेमा केला तेव्हा ही गोष्ट मला विशेषत्वाने जाणवली.
पुढे आमची मैत्री जसजशी वाढत गेली तसतसं मला जाणवत गेलं की फारुख हे फक्त चांगले अभिनेते, उत्तम मित्र नाहीत तर एक अत्यंत दयाळू माणूसही आहेत. अत्यंत कुटुंबवत्सल आहेत. त्यांचं त्यांच्या पत्नीवर तसंच मुली शैस्ता आणि सना यांच्यावर निरतिशय प्रेम आहे. करिअरपेक्षाही त्यांचं पत्नी, मुली यांनाच प्राधान्य असायचं.
आमची दोघांचीही मैत्री टिकून राहिली, काळाच्या ओघात संपली नाही याचं कारण म्हणजे आमच्या दोघांमध्ये अनेक साम्यस्थळं होती. आम्हाला दोघांनाही व्यावसायिक सिनेमे करायचे होते, पण आम्ही करून ते सिनेमे संवेदनशील असावेत असं आम्हाला वाटत होतं. आम्ही दोघांनीही खूपदा सारखेच सिनेमे निवडले. आमची दोघांची आंतरिक उर्मी सारखीच होती. आम्ही दोघंही खूप उत्स्फूर्त अभिनेते होतो. कोणताही शॉट देण्यापूर्वी आम्हाला सराव करावा लागायचा नाही. आणि ज्या मूडचा शॉट दिला असेल त्या मूडचं ओझं बाळगत आम्ही घरी परतलो आहोत असं आमच्या बाबतीत कधीही व्हायचं नाही.
हेमामालिनी यांच्या ‘टेल मी ओ खुदा’ (२०११) या सिनेमात जवळ जवळ २५ वर्षांनी जेव्हा आम्ही दोघं एकत्र काम करू का, अशी विचारणा झाली तेव्हा आम्हाला दोघांनाही खरं तर खूप आनंद झाला, अगदी एक्सायटिंग वाटलं पण मिळतेय संधी तर घेतलीच पाहिजे असं आम्हाला दोघांनाही वाटत नव्हतं. एकतर ज्या भूमिकांसाठी आम्हाला विचारणा झाली होती त्या भूमिका काही फार वेगळ्याबिगळ्या नव्हत्या. पण आम्ही दोघांनी ८० च्या दशकात पडद्यावर जी धमाल उडवली होती, आमच्या जोडीची ती जादू पुन्हा पडद्यावर झळकावी असं हेमाजींना वाटत होतं. मला वाटत होतं की आता काळाच्या ओघात फारुख बदलले असतील आणि तेव्हा त्यांनी मला जे सतावलं होतं ते सगळं आता संपलं असेल. पण माझी ही समजूत ठार चुकीची ठरली. सिनेमाचं संपूर्ण शूट संपेपर्यतं त्यांनी मला जे काही सतावलंय.. मला तर सतत वाटत होतं की ते जुने दिवसच परत अवतरलेत की काय.. अर्थात ते असे एकमेव मित्र होते, ज्यांना माझ्याशी खोडकरपणे वागायची माझ्याकडून परवानगी होती.
त्यांचा माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास होता आणि तो त्यांनी सतत व्यक्त केला. त्यांच्यामुळेच तर मी पटकथा लिहिली. माझा स्वत:चा सिनेमा बनवायला घेतला. त्यांचा माझ्या कामावर, माझ्या क्षमतांवर इतका विश्वास होता की माझ्या सिनेमात माझ्याबरोबर भूमिका कराल का, या प्रश्नावर कोणतेही आढेवेढे न घेता ते लगेचच तयार झाले. माझ्या सिनेमात ते एका होमोसेक्शुअल मुलाच्या वडिलांची भूमिका करणार होते आणि मी त्या मुलाच्या आईची. आपल्या मुलासाठी हे जोडपं कसा लढा देतं असा माझ्या सिनेमाचा विषय होता.
या सिनेमाचं शूटिंग न्ययॉर्कमध्ये माझ्या दिवंगत वडिलांच्या घरात व्हायचं होतं. फारुख शेख यांच्या मृत्यूपूर्वी मी हा सिनेमा बनवू शकले असते तर माझ्या आयुष्यातल्या या दोन माणसांच्या अतिशय तरल अशा स्मृती माझ्याजवळ राहिल्या असत्या. पण आता फारुख शेख आपल्यात नाहीत.. मला तर माझ्यामधला माझा एक भागच कुणीतरी काढून नेला आहे असं वाटत आहे.
(‘संडे एक्स्प्रेस’मधून साभार)
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2014 रोजी प्रकाशित
चांगला अभिनेता, उत्तम मित्र, प्रेमळ माणूस
प्रसिद्ध अभिनेते फारुख शेख यांचे नुकतेच निधन झाले. चष्मेबद्दूर, कथा, साथ-साथ अशा सिनेमांमधून त्यांच्याबरोबर नायिकेची भूमिका केलेल्या त्यांच्या सहयोगी अभिनेत्री दीप्ती नवल यांनी आपल्या या सहकाऱ्याच्या आठवणी जागवल्या आहेत.

First published on: 03-01-2014 at 12:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor farooq sheikh