तमिळ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून ते यकृताशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. मनोबाला यांच्या निधनानंतर तामिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मनोबाला यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. अभिनेता-दिग्दर्शक जीएम कुमार, रमेश बाला यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
मनोबाला यांना त्यांच्या विनोदासाठी ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील ३५ वर्षांच्या कारकिर्दीत ४५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मनोबाला यांनी १९७९ मध्ये भारतीराजाच्या ‘पुथिया वरपुगल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या.
आणखी वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन
मनोबाला यांनी १९८२ मध्ये ‘अगया गंगाई’ मधून दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी जवळपास २५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘पिल्लई निला’, ‘ओरकावलन’, ‘एन पुरुषांथन एनाक्कू मट्टुमथन’, ‘करुप्पू वेल्लई’, ‘मल्लू वेट्टी मायनर’ आणि ‘परंबरियम’ या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच त्यांनी अनेक टीव्ही शोचे दिग्दर्शनही केले होते. निर्माता म्हणूनही ते फार प्रसिद्ध होते.