आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा धंदा झाल्याचं मत व्यक्त केलंय. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तो यापुढे नेटफ्लिक्स, अमॅझॉन प्राईनसारख्या कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करताना दिसणार नाही. हा नवाजुद्दीनच्या चाहत्यांना मोठा धक्का आहे. यापूर्वी नवाजने सेक्रेड गेम, सीरियस मॅन सारख्या हिट वेबसीरिजमध्ये आपली वेगळी छाप सोडली होती. त्यानं बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत हा निर्णय जाहीर केलाय.

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊससाठी ओटीटी प्लॅटफॉर्म धंदा झालाय. अनेक अनावश्यक शोसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डंपिंग ग्राऊंड’ बनलंय. सध्या या ठिकाणी असे शो आहेत जे एकतर पाहण्याच्या लायकीचे नाहीत किंवा कशाचे तरी सिक्वल आहेत ज्यामध्ये नवं काहीच सांगण्यासारखं नाही. मी जेव्हा सेक्रेड गेमसाठी नेटफ्लिक्ससोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा खूप डिजीटल मीडियाविषयी खूप उत्सूकता आणि आव्हानं होती. नव्या लोकांना संधी दिली जात होती. मात्र, आता त्याचा ताजेपणा निघून गेला आहे.”

“अमर्यादीत कंटेंटने गुणवत्तेला मारलं”

“सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतःला स्टार समजणाऱ्या अभिनेत्यांसाठी आणि मोठमोठ्या निर्मात्या कंपन्यांसाठी धंदा (रॅकेट) बनलंय. बॉलीवूडमधील प्रमुख चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व मोठ्या लोकांशी फायद्याचे करार केले आहेत. निर्मात्यांना अमर्यादीत कंटेंट तयार करण्यासाठी प्रचंड मोठी रक्कम मिळते. मात्र, अमर्यादीत कंटेंटने गुणवत्तेला मारलं आहे,” असा आरोप नवाजुद्दीन सिद्दिकने केला.

“ओटीटी प्लॅटफॉर्मवरील जो शो पाहणंही शक्य होत नाही, त्यात मी काम कसं करू?”

नवाजुद्दीन म्हणाला, “मला जर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शो पाहणंही शक्य होत नसेल तर मी त्यात कसं काम करू? या स्टार व्यवस्थेने मोठ्या पडद्याला खाऊन टाकलं. आता आमच्यासारखे तथाकथित OTT स्टार मोठ्या पैशाची मागणी करतात आणि बॉलीवूड ए-लिस्टर्ससारखे ताशेरे ओढतात. कंटेंट हाच निर्णायक आहे हे ते विसरले आहेत. स्टारचं राज्य असायचं तो काळ निघून गेलाय.”

हेही वाचा : ‘लोकांकडे खायला अन्न नाही आणि..,’ मालदीवचे फोटो पोस्ट करणाऱ्या कलाकारांना नवाजचा टोला

“लॉकडाऊनच्या आणि डिजीटल मीडियाच्या प्रभावाआधी बॉलिवूडमधील ए लिस्टर त्यांचा चित्रपट देशभरातील ३,००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचे. प्रेक्षकांना हे चित्रपट पाहण्याखेरीज कोणताच पर्याय उरायचा नाही. आता प्रेक्षकांना अनेक पर्याया खुले आहेत,” असंही नवाजने नमूद केलं.