‘मला म्हातारी म्हणता, पण…’; अर्चना पूरण सिंग झाली भावूक

इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये अर्चनाच्या भावनांचा फुटला बांध

बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरण सिंह. उत्तम अभिनय आणि विनोदशैलीच्या जोरावर या अभिनेत्रीने आज प्रेक्षकांच्या मनात एक स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. अर्चना पुरण सिंगला आपण कायम हसताना आणि लहान मोठ्या गोष्टींचा आनंद लुटताना पाहतो. विशेष म्हणजे बऱ्याच वेळा ती तिच्या आयुष्यातील काही रंजक किस्सेही शेअर करत असते. मात्र अलिकडेच झालेल्या एका लाइव्हमध्ये अर्चना भावूक झाली असून ट्रोलिंगवर ती व्यक्त झाली आहे.

अलिकडेच अर्चनाने इन्स्टाग्राम लाइव्हवर येत चाहत्यांची भेट घेतली. यावेळी प्रेक्षकांच्या कमेंट वाचून ती त्यावर तिचं मत, विचार आणि चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देत होती. त्यातच अनेकांनी तिला तिच्या वाढत्या वयावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्रेक्षकांच्या या कमेंट वाचल्यानंतर अर्चना प्रचंड भावूक झाली आणि तिने याविषयी तिचं मत मांडलं. ‘मी वयस्कर झाले असले तरीदेखील माझी मुलं आणि माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो’, असं अर्चना यावेळी म्हणाली.

या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये एका प्रेक्षकाने “तुमच्या मानेवर सुरकुत्या दिसून येत आहेत”, अशी कमेंट केली. युजरची ही कमेंट पाहिल्यानंतर अर्चनाने त्याला तात्काळ त्याला उत्तर दिलं. मात्र, ती भावूक झाली. “हो, माझ्या मानेवर आहेत सुरकुत्या. मग आता मी काय करु? माझ्या मुलांना मी आवडते, माझ्या नवऱ्याचंही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे मी आनंदात आहे. माझ्यावर कोणी कोणतीही कमेंट केली तरी मला त्याचं काही वाटत नाही, पण ज्या उद्देशाने लोक कमेंट करतात ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे”, असा निगेटीव्ह कमेंट करु नका, असं अर्चना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “अनेक जण माझ्या पेजवर येऊन मला म्हातारी झालीस वगैरे म्हणतात. मला या लोकांना एक विचारायचं आहे, वयस्कर होण्याचा नेमका अर्थ काय? जर वयस्कर होण्याचा अर्थ वय वाढणं असा असेल, तर हो माझं वय खूप आहे. मात्र जर तुम्ही मला वयस्कर किंवा म्हातारी म्हणत असाल तर हा शब्द योग्य नाही. कारण जर या शब्दाचा वापर तुम्ही दुषण लावण्यासाठी किंवा शिवी देण्याच्या उद्देशाने करत असला तर हे अत्यंत चुकीचं आहे, आणि कोणीही मला म्हातारी म्हणत असेल तर मला काही फरक पडत नाही, कारण माझं वय किती आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.”

दरम्यान, ट्रोलिंवर मत मांडत असताना अर्चनाच्या अश्रुंचा बांध फुटला आणि ती लाइव्ह शोमध्येच रडू लागली. अर्चना ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या आहेत. तसंच तिचा छोट्या पडद्यावरही तितकाच वावर आहे. कपिल शर्मा शोप्रमाणेच तिने ‘कॉमेडी सर्कस’ या कॉमेडी शोच्या परीक्षकाचीही भूमिका पार पाडली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress archana puran singh crying during live chat on instagram ssj