सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन वाहिनीने ९०च्या दशकातील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. तसेच या मालिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. डीडी वाहिनीने सर्व विक्रम मोडले असून सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वाहिनीचे स्थान पटकावले. अशातच अभिनेत्री पल्लवी जोशीने मालिका पुन्हा दाखवण्यासंबंधीत वक्तव्य केले आहे.

नुकतीच पल्लवी जोशीने डेक्कन हेरॉल्डला एक मुलाखत दिली. दरम्यान तिने मालिका पुन्हा दाखवताना होणारा फायदा हा कलाकारांना देखील झाला पाहिजे असे म्हटले आहे. ‘मालिकांच्या निर्मात्यांनी मालिका पुन्हा दाखवताना होणारा फायदा हा सर्वांनाच झाला पाहिजे. कारण ही मालिका पुन्हा दाखवताना त्यांना कोणतेही जास्त काम करावे लागत नाही’ असे म्हटले आहे.

‘चॅनेलने कोणतीही मालिका प्रोड्यूस केलेली नाही. ते जुन्या मालिका पुन्हा दाखवत आहेत. त्यामुळे निर्मात्यांना देखील फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. अशावेळी जेव्हा निर्मात्यांना नफा होता. तेव्हा त्यांनी त्यातील काही हिस्सा मालिकेतील कलाकार आणि टेक्नीशन यांना द्यायला हवा’ असे तिने म्हटले आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीने ‘बुनियाद’ या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

पल्लवीच्या या वक्तव्यानंतर चाणाक्य मालिकेचे दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका साकारणारे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी वक्तव्य केले. त्यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना, ‘आता या विषयावर बोलण चुकीचे आहे. मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणे सध्याची परिस्थितीमध्ये कोणत्याही निर्मात्याने मालिका पुन्हा दाखवण्यासाठी पैशांची मागणी केलेली नाही’ असे त्यांनी म्हटले आहे.