चित्रपटातील गाणी म्हणजे त्या चित्रपटाची जमेची बाजू. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये एकंदर चित्रपटगीतांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. काही चित्रपटांच्या वाट्याला त्यातील गाण्यांमुळेच इतके यश प्राप्त झाल्याची बरीच उदाहरणेही आजवर अनेकांनीच पाहिली असतील. चित्रपट गीतांसोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायक आणि संगीतकार. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असाच अक गायक सध्या अनेकांचीच दाद मिळवत आहे. कुटुंबाकडूनच गायनकलेचा वारसा मिळालेला हा गायक म्हणजे आदर्श शिंदे. आदर्शचा आवाज आणि त्याच्या आवाजातील वेगळेपण पाहता प्रेक्षक नेहमीच त्याच्या आवाजाची प्रशंसा करतात. आदर्शने नुकतेच आगामी मराठी चित्रपटासाठी एक गाणे गायले आहे.

मराठी चित्रपट संगीतात अनेक नवे प्रयोग होत असून ते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘ओढ- द अट्रॅक्शन’ या मराठी चित्रपटात वेगळ्या शैलीतील संगीत ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक धमाल गाणे गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आले. ‘सोनाली एंटरटेनमेंट हाऊस’ निर्मित, ‘जी. एस. फिल्मस अकादमी प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ओढ’ चित्रपटाची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली असून दिग्दर्शन दिनेश ठाकूर यांचे आहे. ‘अंगात नखरा डोळ्यात मस्ती.. चल प्रेमाची खेळूया कुस्ती..’ असे बोल असणाऱ्या कौतुक शिरोडकर लिखित या गीताला संगीतकार प्रवीण कुंवर यांनी सुरेल संगीताची साथ दिली आहे.

धमाल मस्तीच्या अंदाजातले हे गीत गायला मिळाल्याबद्दल आदर्श शिंदे यांनी ‘ओढ’चे संगीतकार, दिग्दर्शक व निर्माता यांचे विशेष आभार मानले. डीजेवर ताल धरायला लावणारं हे गीत प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास आदर्श शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. कॉलेज गॅदरिंगच्या जल्लोषपूर्ण वातावरणात हे गीत लवकरच चित्रीत करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झाँसी कि रानी’ मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाईच्या व्यक्तिरेखेने प्रचंड लोकप्रियता लाभलेली अभिनेत्री उल्का गुप्ता आगामी ‘ओढ’ सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. मैत्रीला वयाचे बंधन नसते पण समवयस्कर मुलगा आणि मुलगी यांच्यातही निखळ मैत्री असू शकते यावर समाजाचा विश्वास बसत नाही. अशाच एका निर्मळ मैत्रीची कथा ‘ओढ’ या सिनेमामधून उलगडणार आहे. मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केतकर, जयवंत भालेकर सारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्यासाठी उल्का उत्साही आहे. या सिनेमाचे चित्रीकरण लातूर, तुळजापूर, ताकविकी परिसरात सुरु आहे. उल्कासोबत गणेश तोवर हा नवोदित अभिनेता या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमात मोहन जोशींच्या मुलीच्या भूमिकेत आपल्याला उल्का पाहायला मिळणार आहे.