सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिने ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असतानाच आता त्याचा मुलगाही बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याच्या तयारीत आहे. सुनिल अण्णाचा हा २१ वर्षीय मुलगा आहन पुढच्या वर्षी सिनेमात झळकणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. २०१७ च्या मध्यावर एका अॅक्शन-रोमॅण्टिक सिनेमात आहन दिसण्याची शक्यता आहे. आहनने मात्र ‘अजून मी लहान आहे’ असं म्हणत या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

साजिद नादियाडवालांची निर्मिती असलेल्या एका भव्य सिनेमातून आहन शेट्टी बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याचे संकेत आहेत. स्क्रिप्टवर काम पूर्ण झालं असून दिग्दर्शक आणि आहनसोबत कोणती अभिनेत्री काम करणार यावर सध्या चर्चा सुरु आहे. याआधी नादियाडवाल यांच्या ‘हिरोपंती’ या सिनेमातून टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅननच्या करिअरला सुरुवात झाली होती. आता त्यांच्याच आगामी सिनेमातून आहनही त्याचे करिअर सुरु करण्याची शक्यता आहे.

आहनने अमेरिकेतून अॅक्टिंग आणि फिल्ममेकिंगचा कोर्स पूर्ण केला. सलमान खानची आहनशी असलेली जवळीक पाहून हा बजरंगी भाईजानच त्याला ब्रेक देण्याची चिन्हं होती. अर्थात नादियाडवालासुद्दा सलमानच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत.
आहन सध्या अभिनय, नृत्य आणि दिग्दर्शन या तिन्ही गोष्टींचे धडे गिरवत आहे. नियमित व्यायाम करुन त्याने पिळदार शरीर कमवलं आहे. त्याशिवाय वडिलांसारखी दाढी वाढवून नुकतंच त्याने फोटोशूटही केलं आहे.

आहन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही हे तर येणारा काळच सांगेल. पण, एकंदरीतच आता बॉलिवूड स्टार्सची नवी पिढी बॉलिवूडमध्ये पदापर्णासाठी सज्ज झाली आहे. सैफ अली खान-अमृता सिंग यांची मुलगी सारा खान, बोनी कपूर-श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सनी देओलचा मुलगा करण हे सर्व लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहेत.