घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या पुलकित सम्राटची छायाचित्रकाराला धक्काबुक्की

संतोष नगरकर नामक छायाचित्रकार पुलकित आणि श्वेताचे काही फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता

छायाचित्रकाराच्या अंगावर पुलकित धावून गेला तेव्हा..

अभिनेता पुलकित सम्राट आणि त्याची पत्नी श्वेता रोहिरा यांच्या वैवाहिक नात्यामध्ये लग्नानंतर अवघ्या एका वर्षातच खटके उडू लागले. सरतेशेवटी नात्यामध्ये आलेल्या तणावामुळे पुलकित आणि त्याच्या पत्नीने म्हणजेच श्वेताने या नात्याच्या बंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. श्वेता आणि पुलकित घटस्फोटासाठी नुकतेच वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात गेले होते. पण, न्यायालयातून बाहेर येताना मात्र पुलकितच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता.

कौटुंबिक न्यायालयातून बाहेर येत असताना पुलकित आणि एका छायाचित्रकारामध्ये झटापटही झाली. संतोष नगरकर नामक छायाचित्रकार पुलकित आणि श्वेताचे काही फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता. पण, ज्यावेळी त्याने पुलकित आणि त्याच्या पत्नीचे म्हणजेच श्वेताचे फोटो काढण्यास सुरुवात केली त्यावेळी पुलकित अचानक त्या छायाचित्रकाराच्या अंगावर धावून गेला. सदर घटनेसंबंधी डीएनएसोबत बोलताना नगरकर (छायाचित्रकार) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. ‘पुलकित आणि श्वेता न्यायालयात दुपारी १ च्या सुमारास तेथे आले होते. जवळपास तीन तासांनंतर श्वेता आणि पुलकित न्यायालयातून बाहेर येताच कॅमेरा आणि प्रसारमाध्यमांची नजर चुकवून ते तेथून जात होते. पण, आम्ही त्यांचे फोटो घेण्यासाठी पुढे सरसावताच पुलकितने माझ्या अंगावर धावून येत थेट माझ्या शर्टाची कॉलर धरली. त्यावेळी पुलकितसोबत त्याचे वकिल आणि त्याचे अंगरक्षक होते. त्यांनीही आम्हाला धक्काबुक्की केली’, असे नगरकर म्हणाले आहेत.

दरम्यान, डीएनएच्या वृत्तामध्ये पुलकितचीही बाजू मांडण्यात आली आहे. ‘छायाचित्रकारांनी माझ्या काकांना, मला धक्का दिला आणि ते हे सगळं रेकॉर्ड करत होते. मला तेथून जाऊ द्यावे अशी विनंतीही मी त्यांना केली होती. पण, त्यांनी काही मला तेथून जाण्यास दिलेच नाही’, असे पुलकितने सांगितले. या सर्व प्रकारामध्ये पुलकितच्या पत्नीने तेथून काढता पाय घेतला. सदर प्रकरणी श्वेता म्हणाली की, ‘तेथून निघाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच मला त्या घटनेबद्दल कळले. नशीब मी त्यावेळी तिथून निघाले होते. तुम्ही जेव्हा अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये येता तेव्हा तुमचे खासगी आयुष्य तुमच्यापुरताच मर्यादित राहात नाही. छायाचित्रकारांनी माझेही फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण, मी त्यांना काही विरोध केला नाही’.

pulkit-samrat-attack

पुलकितच्या या अशा वागण्यामुळे सध्या त्याच्याविषयीच्या विविध चर्चांना उधाण येत आहे. सोशल मीडियावरही यासंबंधीचो फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पुलकीत गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या पत्नीसोबत चाललेल्या वादामुळे चर्चेत होताच. पत्नी श्वेता रोहिरासह त्याचा दुरावा आणि त्याची सहकलाकार यामी गौतम हिच्यासोबतची वाढती जवळीक हे पुलकित चर्चेत असण्यामागचे मुख्य कारण आहे असेही म्हटले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After filing for divorce from wife shweta rohira pulkit samrat attacks photographer

ताज्या बातम्या