१ जानेवारी २०१६ रोजी चित्रपट प्रदर्शित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी संगीत रंगभूमीवरील मानाचे पान असलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटापाठोपाठ आता पुढील वर्षी मराठी रंगभूमीवरील ‘नटसम्राट’ही अजरामर नाटय़कृती रसिक प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. नाना पाटेकर आणि रिमा हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून चित्रपटाचा ‘टिझर’ नुकताच प्रदर्शित झाला आहे.
वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ या नाटकाने मराठी रंगभूमी गाजविली. कोणाही अभिनेत्याला आयुष्यात किमान एकदा तरी ‘नटसम्राट’ करावासा वाटतोच वाटतो. या नाटकावर याच नावाचा चित्रपट तयार होत असून त्यात नाना पाटेकर आणि रिमा हे अनुक्रमे ‘आप्पासाहेब बेलवलकर’ आणि ‘कावेरी’ या भूमिकेत आहेत. नाना पाटेकर आणि रिमा यांच्या नावामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांनाही खूप मोठी उत्सुकता आहे. चित्रपटाच्या ‘टिझर’मुळे काही प्रमाणात का होईना ही उत्सुकता शमली आहे. ‘नटसम्राट’मधील गाजलेल्या ‘टू बी ऑर नॉट टू बी’ (जगावं की मरावं) हे स्वगत ‘टीझर’च्या सुरुवातीला आहे. ‘कुणी घर देता का घर’ हे स्वगतही यात पाहायला मिळते. नाना पाटेकर, रिमा यांच्याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हेही चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, दत्ता भट, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी अशा दिग्गजांनी ‘नटसम्राट’ रंगविला आहे. शांता जोग यांनी साकारलेली ‘कावेरी’ रसिकांच्या आजही स्मरणात आहे. अभिनेता म्हणून ‘नटसम्राट’ साकारणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अभिनयासाठी ते एक आव्हानही असते.
बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी व यश मिळाले असले तरी नाना पाटेकर यांची मराठीशी नाळ अद्यापही जुळलेली आहे. मोजक्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय सामर्थ्यांचे दर्शन घडविले आहे. गेल्या वर्षी त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनाही चित्रपटाचे चांगले स्वागत केले होते. आता ‘नटसम्राट’च्या निमित्ताने नाना यांच्या अभिनयाचे गारुड पुन्हा एकदा समस्त रसिकांवर पडणार आहेच पण एक नवा ‘नटसम्राट’ही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. फिनक्राफ्ट मीडिया अ‍ॅण्ड एण्टरटेनमेंट प्रा. लि, गजानन चित्र आणि आणि ग्रेट मराठा एण्टरटेनमेंट प्रस्तुत विश्वास विनायक जोशी, नाना गजानन पाटेकर निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दíशत ‘नटसम्राट’ हा चित्रपट १ जानेवारी २०१६ रोजी प्रदíशत होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After katyar natsamrat will be super hit
First published on: 15-11-2015 at 02:06 IST