छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता. या ट्रेलरवरुन कपिल शर्माने खास नव्या पर्वासाठी वजन कमी केल्याचे लक्षात येत आहे. कार्यक्रमाचे अन्य काही प्रोमो देखील प्रसारित झाले आहेत. ट्रेलर आणि प्रोमोवरुन कपिलच्या शोमध्ये काही जुन्या कलाकारांच्या जागी नवे कलाकार दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून कपिल शर्माचा हा शो टीआरपीच्या यादीमध्ये टॉपवर आहे. कपिल शर्मा, सुमोना चक्रवर्ती, सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, भारती सिंह अशा तगड्या कलाकारांची फौज असलेल्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी भेट देत असतात. काही महिन्यापूर्वी कपिल शर्मा त्यांच्या संपूर्ण टीमसह परदेशामध्ये शो करायला गेला होता. त्यांच्या या परदेश दौऱ्यामुळे कार्यक्रमाने काही दिवसांची विश्रांती घेतली होती. आता चार महिन्यांच्या ब्रेकनंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता कृष्णा अभिषेकने काही वैयक्तिक कारणामुळे शो सोडल्याची बातमी समोर आली होती. या संदर्भात कार्यक्रमाच्या करारामध्ये झालेल्या चुकांमुळे नव्या पर्वामध्ये सहभागी होत नसल्याची माहिती त्याने दिली होती. आता कृष्णापाठोपाठ भारती सिंह देखील कार्यक्रमातून बाहेर पडली आहे. बाळाच्या जन्मानंतर काही वेळ ब्रेक घेण्याचा निर्णय तिने घेतला आहे. तसेच ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’च्या नव्या पर्वामध्येही भारती सूत्रसंचालनाचे काम करणार आहे. आधी दिलेला शब्द पाळत भारतीने कपिल शर्मा शो न करण्याचे ठरवले आहे. कृष्णा अभिषेक, भारतीनंतर आणखी एका कलाकाराने शोमधून एक्झिट घेतली आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये अभिनेता ‘चंदन प्रभाकर’ चंदु चायवाला हे पात्र साकारायचा. आता चंदन प्रभाकरने देखील कार्यक्रम सोडल्याची घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेमुळे त्याच्यात आणि कपिलमध्ये वाद झाला असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ‘शो सोडण्याचे कोणतेही विशिष्ट कारण नसून सलग काम केल्यानंतर थोड्यावेळासाठी ब्रेक घ्यावा, असं मी ठरवले आहे’, अशी प्रतिक्रिया चंदन प्रभाकरने दिली आहे. कपिल आणि चंदन या शोआधीपासूनचे मित्र आहेत.

‘द कपिल शर्मा शो’ येत्या शनिवारी १० सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. शोच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, रकुल प्रीत सिंह, शगुन मेहता त्यांच्या ‘कटपुतली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहणार आहेत.