अभिनेता सुबोध भावे याने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आणि सर्व सामान्यांपासून सिनेवर्तुळातही याची चर्चा रंगू लागली आहे. या व्हिडिओत सुबोधने मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर बेशिस्तपणे ट्रक, गाड्या आणि परवानगी नसताना बाईक चालवणा-यांवर आक्षेप नोंदवला आहे. शिवाय मध्येच आडव्या येणा-या गाय आणि बैलांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते हेही निदर्शनास आणले आहे. या रस्त्यावरच अभिनेता आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचे अपघातात निधन झाले होते. याच पार्श्वभूमीवर काही कलाकारांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियम धाब्यावर बसवण्याची सवयच झाली आहे – शिल्पा नवलकर, अभिनेत्री / लेखिका
मला आतापर्यंत तरी असा ट्राफिक जॅमचा अनुभव आलेला नाही. मात्र ट्रक, गाड्या आणि बाईक यांच्या वेगावर काही बंधन नसतेच. खरे तर बाईकना एक्सप्रेस वेवर बंदी आहे. मात्र तेथील जवळच्या गावातील तरूण मुलं वेगात विरुद्ध दिशेने बाईक भरधाव वेगात चालवत येतात. ट्रकसाठी देखील एक लाईन राखीव असते. मात्र, ते हे सर्व नियम धाब्यावर बसवत तीन-तीन लेनमध्ये जाऊन इतर वाहनांना पुढे जाऊ देत नाहीत. यातच अनेक अपघात होत असतात. अनेकदा एखादा अपघात झाला असल्यास एक लेन बंद केली जाते. तेव्हा तर हे गाडीवाले आणि बाईकस्वार विरुद्ध दिनेशे भरधाव वेगात येतात, अशा वेळेस केवळ त्यांच्याच जीवाला धोका नसतो तर समोरच्या वाहनांनाही अपघाताचा धोका असतो. याची काळजी कोणीच घेत नाही. तेथे उभे असलेल्या पोलिसांच्या समोर हे जात असतात. पण तेही त्यांना अडवत नाही. अशा नियम न पाळणाऱ्या वाहनचालक, ट्रकचालक आणि बाईकस्वार यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. तरच त्यांना भीती राहील आणि असे अपघात होणार नाहीत. शिवाय नियम न मोडणे ही आपण सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे आधी आपल्यापासूनच सुरुवात करूयात.


टोल घेऊनही रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे – शिवकुमार पार्थसारथी, चित्रपट निर्माता
आम्ही ऐरोलीकरांनी ‘टोलविरोधी जन आंदोलन’ पुकारले होते. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी अनेक खेपा काढल्या. मात्र त्यातून काहीच साध्य झाले नाही. ऐरोली टोलच्या ५ किमी अंतरावर राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना प्रत्येक वेळी टोल भरावा लागणे हे वाहतुकीच्या नियमावलीत नमूद केलेले नाही. याविरुद्ध आम्ही स्थानिक रहिवाशांनी टोल माफीसाठी लढा पुकारला. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट आम्हालाच किती पास पाहिजेत? असे उद्धट प्रश्न विचारून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. टोल घेऊन देखील रस्ते अत्यंत वाईट परिस्थितीत असतात. याबाबत विचारले असता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ते टोल मुंबईतील १७ फ्लायओव्हरच्या डागडुजीसाठी वापरत असल्याचे उत्तर दिले. असा हा वाईट अनुभव आम्हाला आला. २०१५ साली माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे होते. तेव्हा या भल्या मोठ्या टोलच्या रांगेत ऍम्ब्युलन्सलाही जायला देत नव्हते. कारण काय तर पुढे असलेल्या गाड्यांकडून टोल वसूल करण्यात हे कर्मचारी दंग होते. हा सगळा अनुभव आल्यानंतर मी तर चार चाकी गाडी चालवायचे सोडूनच दिले. आता मी सर्व ठिकाणी बाइकनेच प्रवास करतो.

व्हिडिओत काय म्हणालेला सुबोध?
‘नमस्कार आज मुंबईहून पुण्याला प्रवास करतोय एक्स्प्रेस हायवेवरुन आणि आजचा माझा अनुभव फार विलक्षण असा आयुष्यभर स्मरणात राहिल असा होता. एक्स्प्रेस हायवे लागल्यापासून माझ्या लक्षात एक गोष्ट आली, की हा रस्ता फक्त ट्रकवाल्यांसाठी बनला आहे. कारण तीन लेनवरुन गाड्या न चालवण्याचे नियम बहुतेक करुन त्यांच्यासाठी नसावेत किंवा कुठुनही कशी गाडी चालवा, हे नियम बहुतेक करुन त्यांच्यासाठीच असावेत. काही काही अंतरावर मला बाईकवाले दिसले. काहीजण चुकीच्या बाजूने येत होते, काही आमच्याचबरोबर चालत होते, काही आमच्या वेगाशी स्पर्धा करत होते. मग अचानक मला वाटलं की आपण नॅशनल पार्कमध्ये आलोय. मला काही प्राणी दिसले. गाई-बैल चरताना दिसल्या आणि मग लक्षात आलं की याच महिन्यात दोन-तीन वर्षांपूर्वी आमचा अत्यंत जवळचा मित्र आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे या ठिकाणीच अपघाती निधन झालं होतं. अनेक लोकांचे जवळचे नातेवाईक गेले असतील, आईवडील गेले असतील. मावशी गेली असेल, काका-मित्र गेले असतील. मुलं गेली असतील. पण तरीसुद्धा आम्ही अजून सुधारलेलो नाही… आम्ही अजून त्याच पद्धतीने हा एक्स्प्रेस हायवेवरचा कारभार हाकतोय. टोल भरतोय आणि स्वत:च्या जीवाशी खेळतोय? खूप सुखद असा प्रवास कधीच विसरु शकणार नाही आणि मला असं वाटतं, की यात सुधारणा व्हायचे काहीच चान्सेस नाहीत, असो जय हिंद जय महाराष्ट्र.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After paying toll still road condition is very complicated marathi celebrities reaction on mumbai pune expressway
First published on: 03-12-2016 at 09:26 IST