माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही गेली तीन वर्षे रुपेरी पडद्यापासून दुरावली आहे. दोन वर्षापूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने बॉलीवूडला राम राम ठोकला की काय असे वाटत होते. पण, आता ती तिच्या आवडत्या मणिरत्नम या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुर्नपदार्पण करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले तीन वर्ष ऐश्वर्याने एकही चित्रपट केलेला नाही. मात्र, आता तिने मणिरत्नमच्या चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. संजय लीला भन्सालीच्या ‘गुजारिश’ चित्रपटात ती शेवटची रुपेरी पडद्यावर झळकली होती. त्यानंतर तिने चित्रपट केले नाहीत पण जाहिराती आणि ‘कान’सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ती प्रकाशझोतात राहिली.
ऐश्वर्याची मणिरत्नमशी खूप चांगली मैत्री असून, तिने त्याच्या ‘इरुवार’, ‘गुरु’ आणि ‘रावण’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रावण’मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकने एकत्र काम केले होते. परंतु, यावेळी केवळ ऐश्वर्याच त्याला चित्रपटात हवी असल्याचे कळते.