अभिषेक बच्चन सध्या विदेशात एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने ऐश्वर्याने त्याच्याविनाच करवा चौथ साजरा केला. ‘ओ माय गॉड’चा दिग्दर्शक उमेश शुक्लाच्या ‘मोरे अपने’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिषेक विदेशात आहे. असे असले तरी करवा चौथसाठी आवश्यक असलेले रितीरिवाज ऐश्वर्याने स्काइपचा वापर करून पूर्ण केले. स्काइपद्वारे पतीशी संपर्क साधून त्याचे मुखदर्शन घेतले. ऐश्वर्या आणि अभिषेकला स्काइपद्वारे करवा चौथ साजरे करताना पाहून अमिताभ बच्चन यांना खूप कौतुक वाटले. अमिताभ बच्चन यांनी सोशल साइटवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे, अभिषेक देशाबाहेर चित्रीकरणात व्यस्त आहे… त्यामुळे ऐश्वर्याने करवा चौथच्या दिवशी स्काइपद्वारे पतीचे मुखदर्शन केले.

लिंबू रंगाच्या पोशाखात ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी तिच्याबरोबर सासरे अमिताभ बच्चन आणि सासू जया बच्चन हे देखील होते. करवा चौथच्या दिवशी पहिल्यांदाच ऐश्वर्यापासून दूर असलेला अभिषेक ट्विटरवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हणतो, मी पहिल्यांदाच करवा चौथच्या दिवशी पत्नीपासून दूर आहे. स्काइपद्वारे रीतीरिवाज पूर्ण झाल्याने देवाचे आभार! या खास दिवशी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात नाही पण व्हर्च्युअली ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र येवू शकल्याने चाहत्यांना बरे वाटले.