दमदार अभिनय व मनमोहक सौंदर्य या दोन गोष्टींमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘गुरू’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र ऐश्वर्या जितकी गुणी अभिनेत्री आहे, तितकीच ती बेधडक आणि स्पष्टवक्तीही आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविणाऱ्या सूत्रसंचालकाची ऐश्वर्याने चांगलीच कानउडणी केल्याचं दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका इंटरनॅशलन चॅट शोमधील आहे. यामध्ये डेव्हिड लेटरमॅन शोचं सूत्रसंचालन करताना दिसत असून बोलण्याच्या ओघात त्याने भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविली. मात्र ऐश्वर्यानेदेखील अत्यंत शांत शब्दांमध्ये त्याला उत्तर दिलं मात्र तिचं उत्तर ऐकून डेव्हिड ची चांगलीच बोलती बंद झाली
‘अजूनसुद्धा तू तुझ्या आई-वडिलांसोबत राहते हे खरं आहे का?’, असा प्रश्न डेव्हिडने ऐश्वर्याला विचारला. या प्रश्नावर ऐश्वर्याने ‘हो’ असं उत्तर दिलं. ऐश्वर्याचं उत्तर ऐकल्यानंतर त्याने पुन्हा एकदा ‘आजही भारतात इतकं मोठं झाल्यानंतर आई-वडिलांसोबत सर्रास राहिलं जातं का?’ असा दुसरा प्रश्न विचारला. त्याचा हा प्रश्न ऐकल्यानंतर उपस्थित सारेच हसायला लागले. मात्र डेविटचा हा प्रश्न ऐकल्यानंतर ऐश्वर्या थोडी नाराज झाली आणि तिने सडेतोड उत्तर दिलं.
View this post on Instagram
‘हो. भारतात आजही मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात. ही चांगली गोष्ट आहे. आणि काय आहे ना, आम्हाला आई-वडिलांसोबत जेवायचं असेल तर त्यासाठी अपॉइंमेंट घ्यावी लागत नाही’, असं उत्तर ऐश्वर्याने दिलं. तिचं उत्तर ऐकल्यानंतर डेव्हिड ने परत कोणताच प्रश्न तिला विचारला नाही.
दरम्यान, ऐश्वर्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती मणिरत्नम यांच्या चित्रपटात झळकणार असून अनुराग कश्यपच्या ‘गुलाबजामुन’ या चित्रपटातही झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.