अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी पेलण्याची तयारी बॉलीवूड कलाकार सहसा दाखवत नाहीत. अगदी अभिनय आणि दिग्दर्शन दोन्हीत मातब्बरी असलेल्या फरहान अख्तरनेही आत्तापर्यंत दोन्ही गोष्टी एकत्र करण्याचा मोह टाळला आहे. सध्या मात्र ‘सिंघम २’च्या यशामुळे सुखावलेल्या अजय देवगणने दुसऱ्यांदा अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन्ही जबाबदाऱ्यांचे शिवधनुष्य एकाच वेळी पेलायचे ठरवले आहे. अजयने या आधी ‘यू, मी और हम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता तो पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत चाहत्यांसमोर येणार आहे.
अजयने त्याच्या समकालीन बॉलीवूड कलाकारांच्या आधीच चित्रपटनिर्मिती पाऊल टाकले होते. २००० साली त्याने अजय देवगण फिल्म्स प्रॉडक्शनची सुरूवात केली होती. त्यानंतर २००८ साली त्याने पहिल्यांदा ‘यू मी और हम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात अजय आणि पत्नी काजोल दोघेही मध्यवर्ती भूमिकेत होते. त्यानंतर मात्र अजयने अभिनेता म्हणून आपली कारकीर्द भक्कम करण्यावर भर दिला होता. ‘सिंघम’, ‘सिंघम २’, ‘सन ऑफ सरदार’, ‘गोलमाल’ चित्रपट मालिका या चित्रपटांनी त्याला शंभर कोटी क्लबमध्ये प्रस्थापित केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपल्या आवडीच्या दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे मोहरा वळवला आहे.
सध्या तो प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’चे चित्रिकरण करतो आहे. त्यानंतर रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल ४’चीही तयारी सुरू आहे. मात्र, त्याआधीच त्याने आपल्या आगामी दिग्दर्शकीय चित्रपटाचीही घोषणा केली आहे. ‘शिवाय’ असे या चित्रपटाचे नाव असून अजय मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे त्याच्या निर्मितीसंस्थेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या चित्रपटात अजयची नायिका म्हणून नवोदित अभिनेत्री सायेशा हिची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची नात सायेशा ही ‘शिवाय’मधून बॉलीवूड पदार्पण करणार आहे. सध्या तरी चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन काम सुरू आहे. त्यामुळे चित्रिकरणाबद्दलचे तपशील अजून गुलदस्त्यात असले तरी ‘शिवाय’ची निर्मिती अजय देवगण फिल्म्स प्रॉडक्शन आणि इरॉस इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgan second time in the role of director
First published on: 03-10-2014 at 02:55 IST