अ‍ॅक्शनपट असला की, बऱ्याचदा हिंदी-दाक्षिणात्य चित्रपटांतील नायक तोंडाने फारसे बोलत नाहीत. ते फक्त हातापायांनी जो येईल त्याची धुलाई करतात आणि कायम थंड, राग देणाऱ्या (अर्थपूर्ण?) नजरेने बघत असतात. गेली कित्येक वर्षे अ‍ॅक्शनपट आणि त्यांच्या हिरोंचा हा साचा बदललेला नाही. हिंदी अ‍ॅक्शनपटांच्या या मुख्य प्रवाहात आत्ताच्या परिस्थितीनुसार बदल करताना दिग्दर्शक ए. आर. मुरुगडोस यांनी या साच्यात नायिकेला म्हणजे सोनाक्षी सिन्हाला चपखल बसवलं आहे. एका अर्थाने ही अकिराच्या जिद्दीची गोष्ट असली तरी ती रूढी-परंपरांच्या त्याच त्याच चौकटीतून बाहेर पडत नाही.

जोधपूरमध्ये राहणारी लहानगी अकिरा शर्माचे (सोनाक्षी सिन्हा) तिच्या वडिलांशी (अतुल कुलकर्णी) घट्ट नाते आहे. तिचे वडील मूकबधिर आहेत, पण त्यांनी मुलीला वेगळ्या पद्धतीने वाढवण्यावर भर दिला. शाळेतून येत असताना एका प्रसंगात तरुणीवर झालेला अ‍ॅसिड हल्ला, ravi09त्यासाठी निरागस अकिराने साक्ष दिल्यानंतर तिच्यावर झालेला हल्ला, त्यानंतर वडिलांनी तिला कथ्थकऐवजी कराटे प्रशिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय आणि याचे फलित म्हणून त्याच अ‍ॅसिड फेकणाऱ्या तरुणावर प्रतिहल्ला चढवल्यानंतर तिची रिमांड होममध्ये झालेली रवानगी, या सुरुवातीच्या प्रकरणांमधून अकिराची जडणघडण आणि त्या मुशीतून तिचं तयार झालेलं वेगळं व्यक्तिमत्त्वही लक्षात येतं; पण तिच्या आजूबाजूला दाखवलेल्या घटना त्याच ठोकळेबाज आणि भडक दाक्षिणात्य शैलीतून आलेल्या आहेत. मूळ तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याने त्याची भडक, बटबटीत मांडणी त्याच पद्धतीने ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मनाने प्रेमळ, पण कणखर अशी लढाऊ वृत्तीची अकिरा तिच्याबरोबर घडणाऱ्या साध्या साध्या गोष्टींच्या बाबतीतही प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत नाही. उलट ती त्या प्रसंगांपासून पळताना दिसते.

अकिराची लढाऊ वृत्ती दाखवण्यासाठी म्हणून दिग्दर्शकाने स्वतंत्र कथा तयार केली आहे ज्यात अकिरा फसत जाते. चार भ्रष्टाचारी पोलीस एका अपघात प्रकरणात सापडलेल्या पशांसाठी या चौघांनी रचलेला डाव आणि त्यात आपण अडकू नये म्हणून पोलिसी वर्दीचा वापर करत सत्य कळणाऱ्यांना संपवण्याचा त्यांचा प्रयत्न यात अकिरा पूर्णपणे फसते. कोणत्या पद्धतीने ती त्यातून सुटते, ही या चित्रपटाची कथा आहे; पण चित्रपटाची कथा अगदी प्रेक्षकांचा संयम तुटेपर्यंत ताणली आहे. अनुराग कश्यपने यात भ्रष्टाचारी पोलीस एसीपी राणेची व्यक्तिरेखा साकारली आहे. अनुराग कश्यप आणि त्याच्या जोडीला तीन मराठी कलाकार या पोलिसांच्या भूमिकेत आहेत. नंदू माधव, लोकेश गुप्ते आणि उदय सबनीस अशा तीन कलाकारांना हिंदीत एकत्र काम करताना पाहून धम्माल येते. या चौघांची समांतर अशी कथा आहे, त्यामुळे ‘अब तक छप्पन्न’ स्टाइल या छोटय़ाशा कथेत चौघांनाही चांगला वाव मिळाला आहे. सोनाक्षी सिन्हाची अकिरा खूप वेगळी आहे. ती आततायीपणा करत नाही, शांत राहून मार्ग काढते, अ‍ॅक्शनची वेळ येते तेव्हा हिरोंना लाजवेल अशा पद्धतीने धुलाई करते, त्यामुळे सोनाक्षीने शंभर टक्के यात आपला जीव ओतला आहे, मात्र कथेतच तिची व्यक्तिरेखा विसविशीत, सिस्टमसमोर हतबल अशी केल्याने त्याग हा इथे अ‍ॅक्शन हिरॉईनलाही सुटलेला नाही हेच दुर्दैव म्हणावे लागेल. कोंकणा सेन शर्माने साकारलेल्या राबिया शेखलाही ती एसपी असूनही विनाकारण व्यवस्थेची वेसण घातली आहे. अकिराचा भाऊ, तिची आई, वहिनी आणि वहिनीचा भाऊ अशा अनेक व्यक्तिरेखा चित्रपटात असण्याचं कारणच लक्षात येत नाही. चित्रपटात इनमीनतीनच गाणी आहेत. ज्यापकी ‘केहकशा तू मेरी’ या गाण्यासाठी संगीतकार विशाल-शेखर जोडीने ‘बीपी’ चित्रपटातील त्यांच्या ‘हरवली पाखरे’ याच गाण्याची चाल तशीच्या तशी वापरली आहे. त्यामुळे तेही मनावर ठसत नाही. स्त्रीच्या जिद्दीची गोष्ट अखेर व्यवस्थेच्या चौकटीवरच येऊन थांबते..

अकिरा

दिग्दर्शक – ए. आर. मुरुगडोस

कलाकार सोनाक्षी सिन्हा, अनुराग कश्यप, लोकेश गुप्ते, नंदू माधव, उदय सबनीस, अमित साध, कोंकणा सेन शर्मा, अतुल कुलकर्णी आणि स्मिता जयकर.