जगभरातील विविध फिल्म फेस्टिवल्स मध्ये मराठी सिनेमा सातत्याने आपली छाप पाडतोय. विवेक पंडित प्रस्तुत व गोविंद आहेर निर्मित ‘आक्रंदन’ या सिनेमाची निवड यंदाच्या दिल्ली फिल्म फेस्टिवल’साठी  करण्यात आली आहे. ५ ते १० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दिल्ली फिल्म फेस्टिवल’मध्ये या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. जगभरातून आलेल्या अनेक सिनेमांच्या नावातून ‘आक्रंदन’ ची झालेली निवड  नक्कीच कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या देशातील सिनेमांची मेजवानी सिनेरसिकांना दिल्ली फिल्म फेस्टिवलमध्ये मिळणार आहे. हिंदी, तामिळ, तेलगु, चायनीज ह्या चार भाषेत हा चित्रपट डब करण्यात आला आहे.
महिलांवर सुरु असलेल्या अत्याचारांचे सत्र कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच वाढतेय. पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासोबतच समाजाची मानसिकता बदलण्यासाठीही ठोस उपाययोजना करणे खूप महत्वाचे आहे. स्त्री संरक्षणाविषयीच्या अशाच अनुत्तरीत प्रश्नांचा वेध ‘आक्रंदन’ या आगामी मराठी सिनेमात घेण्यात आला आहे.
छोट्या पडद्यावरील ८० हून अधिक मालिकांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर ‘आक्रंदन’ या सिनेमाच्या माध्यमातून शशिकांत देशपांडे चित्रपट दिग्दर्शनात प्रवेश करीत आहेत. उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी यासोबत विक्रम गोखले, स्मिता तळवळकर, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, तेजश्री प्रधान, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या ही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘आक्रंदन’ची कथा, दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून पटकथा- संवाद शशिकांत देशपांडे व मिलिंद इनामदार यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण हिंदीतील सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर दामोदर नायडू यांनी केलंय. संकलन मनोज सांकला यांचं आहे. एका दलित स्त्रीवर झालेला अत्याचार, त्यानंतर झालेला गदारोळ आणि त्यानंतर समाजात न्यायासाठी झालेला उठाव या भोवती सिनेमाचे कथासूत्र गुंफण्यात आले आहे.