हे तर साऱ्यांनाच माहितीये की अक्षय कुमार सिनेसृष्टीत येण्यापूर्वी एक उत्तम शेफ होता. आता वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत मुलगी निताराही पाककलेचे धडे गिरवत आहे. सामान्यतः अक्षय आणि ट्विंकल आपल्या मुलीला प्रसारमाध्यमांसमोर आणणे टाळतात. ट्विंकल आणि अक्षय नेहमीच आपल्या मुलीचे चेहरा न दिसणारे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. यावेळीही ट्विंकलने निताराचा स्वयंपाक करताना फोटो शेअर केला आहे, पण त्यातही तिचा चेहरा लपलेलाच आहे.
ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निताराचा शेफच्या पेहरावातला फोटो शेअर केला आहे. या फोटोत नितारा स्वयंपाक घरात उभी राहून काम करताना दिसते तिने तिच्या नावाचे अॅपरन आणि टोपी घातली आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत ८१ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.
दरम्यान, ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘द ग्रेट इंडिया लाफ्टर चॅलेंज’ची परीक्षक मल्लिका दुआचे वडील अक्षयने मल्लिकावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे ते चांगलेच भडकले आहेत. शोमध्ये श्याम रंगीलाच्या सादरीकरणानंतर अक्षय मल्लिकाला म्हणतो, ‘मल्लिका जी आप बेल बजाओ, मैं आपको बजाता हूं।’ यावरच विनोद दुआ यांनी आक्षेप घेतला होता.
सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं की, ‘अक्षय कुमार यांची भाषा आणि विनोदबुद्धी अशाप्रकारची आहे. स्टार प्लस…जागे व्हा.’ मात्र, काही वेळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीटसुद्धा केली होती. अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी २.० सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सुपरस्टार रजनीकांत आणि अॅमी जॅक्सन दिसणार आहेत.