बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी सिनेमा ‘जॉली एलएलबी २’च्या टीमला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. चपलांचे उत्पादन करणाऱ्या ‘बाटा’ या उत्पादकांनी सिनेमाच्या टीमला अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

‘बाटा’ या कंपनीचा आरोप आहे की, या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ‘बाटा’शी निगडीत एक आक्षेपार्ह संवाद आहे. या संवादात बाटाच्या चपलांना निकृष्ट दर्जाचे उत्पादन असे संबोधून त्याची थट्टा उडवण्यात आली आहे. यामुळे या ब्रॅण्डची प्रतिमा मलीन झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यांच्या या संवादामुळे बाटा कंपनीला आर्थिक नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

ट्रेलरच्या एका दृश्यात उच्चभ्रू वकीलाची व्यक्तिरेखा साकारणारे अन्नू कपूर, अक्षयच्या व्यक्तिरेखाला म्हणतात की, ‘बाटा का जूता और टुच्ची सी टेरीकॉट की शर्ट पहनकर हमसे जुबान लड़ा रहे हैं।’

ट्रेलरमधल्या या दृश्यामुळे बाटा कंपनीने सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कंपनीला ही शंका आहे की, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचाहा कट असू शकतो. कारण त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या एका ब्रॅण्डचा अक्षय कुमार स्वतः चेहरा आहे.

काय आहेत कंपनीच्या मागण्या

  • कंपनीने सिनेमाचा ट्रेलर आणि सिनेमातून हे दृश्य काढून टाकण्याची मागणी केली आहे.
  • कंपनीच्या नावाला बदनाम करण्यावरुन लिखित स्वरुपात माफी मागावी. तसेच भविष्यात बाटा ब्रॅण्डच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवले जाणार नाही याची हमीही लिखित स्वरुपात हवी.
  • चुकून या ब्रॅण्डचे नाव घेण्यात आले अशी नोटीस ट्रेलर आणि सिनेमाच्यादरम्यान द्यावी.

कोणा कोणाला पाठवली नोटीस

बाटा कंपनीने अक्षय कुमार, अन्नू कपूर, दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यासोबत सिनेमाचे कार्यकारी निर्माता नरेन कुमार, कंपनीचे डायरेक्टर दीपक जैकब आणि अमित शाह यांनाही नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूरने याबाबतीत स्पष्टीकरण देताना सांगितले की, या निर्माते यासंदर्भात बोलतील. कारण या प्रकरणावर काहीही बोलण्याचा मला अधिकार नाही. याशिवाय या प्रकरणावर प्रोडक्शन हाऊसकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.