जम्मू-काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलातील जवानांप्रती अनेकांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या होत्या. शासनातर्फेही विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला होता. बॉलिवूडमधूनही विविध कलाकारांनी शहीद जवानांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण, या सर्व कलाकारांमध्ये स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले आहे ते म्हणजे अभिनेता अक्षय कुमारने.

गेल्याच आठवड्यामध्ये सैन्यदलातील तीन जवानांना एका चकमकीमध्ये वीरमरण आले. आसाम येथील दिबगोई येथे झालेल्या शहिदांमधीलच एक जवान म्हणजे एन. के. नरपत सिंग. शहिद नरपत सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांची ३ मुलं असे कुटुंब आहे. नरपत सिंग यांना आलेल्या वीरमरणाबद्दल ज्यावेळी खिलाडी कुमारला समजले त्यावेळी तेव्हा तातडीने तो मदतीसाठी पुढे सरसावला. अक्षय कुमारने या प्रकरणी शहीद नरपतसिंग यांच्या पत्नीचे फक्त सांत्वनच केले नाही तर, त्यांना आर्थिक मदतही देऊ केली आहे. खिलाडी कुमारने ९ लाखांची मदत करत पुन्हा एकदा शहीदांच्या कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असूनही खिलाडी कुमार त्याच्या सैन्यदलातील मित्रमंडळींसोबत संपर्कात आहे. याआधीही अक्षयने शहीदांच्या कुटुंबियांना मदत केली होती. त्यामुळे सध्यातरी देशाप्रती आणि सैन्यदलाप्रती नेहमीच मदतीसाठी पुढे सरसावणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता अक्षय कुमारचे नाव नेहमीच पुढे असते. दरम्यान खिलाडी कुमार सध्या त्याच्या ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. दरम्यान हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आला आहे. उत्तर भारतामध्ये सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मथुरा येथील संतानी नंदगाव आणि बरसाना गावातील मुलगा-मुलगीच्या विवाहावर आक्षेप दर्शविला आहे. चित्रपटातील विवाहाच्या दृश्यावर आक्षेप दर्शवत लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप दिग्दर्शकावर करण्यात आला आहे. संताच्या मते, चित्रपटाच्या एका दृश्यात गावात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा तोडण्यात आली आहे. या परंपरेनुसार सदर दोन्ही गावातील मुलगा आणि मुलगी एकमेकांशी विवाह करू शकत नाहीत. सोमवारी झालेल्या महापंचायतीमध्ये सर्व संतांनी मिळून दिग्दर्शकाची जीभ छाटण्याचा निर्णय घेतला. महापंचायतीने निर्णय जाहीर करत म्हटले की, जी व्यक्ती त्या दिग्दर्शकाची जीभ छाटून आणेल त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

सध्यातरी खिलाडी कुमार एका वेगळ्याच विषयावरील चित्रपटासह आणि शीर्षकासह सर्व चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरसह स्क्रिन शेअर करत खिलाडी कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.