‘रुस्तम’ सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सगळ्यांचे आभार मानणारा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो म्हणतो, ‘या क्षणाला माझ्या मनात जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी धन्यवाद हा फार लहान शब्द आहे. मी माझ्या चाहत्यांचे आणि पुरस्कार परीक्षकांचे आभार मानतो. माझ्यासाठी रुस्तमची व्यक्तिरेखा फार खास आहे. सिनेमातल्या एका भूमिकेसाठी का असेना, पण भारतीय नौदलचा गणवेश घालणं हाच एक मोठा सन्मान आहे. आता राष्ट्रीय पुरस्काराने तर याला अजून खास बनवले.’

व्हिडिओमध्ये अक्षयने पत्नी ट्विंकल खन्नाचेही आभार मानले. ‘मी माझी पत्नी ट्विंकलचेही आभार मानतो. बरं केलंस तू पुरस्कार सोहळ्यात जाणं बंद केलंस, नाही तरी तुला एकही पुरस्कार मिळत नाही. या गोष्टीवरुन ती मला नेहमी चिडवायची. पण आता मी तिला सांगू शकेन की उशिरा का होईना मला पुरस्कार मिळाला. मी माझा हा पुरस्कार आई- बाबा आणि माझ्या बायकोला समर्पित करतो.’ अक्षयचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. १९५९ मध्ये नानावटी प्रकरणावरुन या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. या सिनेमात त्याने एका देशभक्त नौदल अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली होती.

अक्षयसोबतच अभिनेत्री सोनम कपूरलाही ‘नीरजा’ या सिनेमासाठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला. हे दोघंही सध्या ‘पॅडमॅन’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. दोघंही ‘पॅडमॅन’च्या सेटवर असताना त्यांना ही आनंदाची गोष्ट कळली. तेव्हा सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फार आश्चर्य वाटल्याचा तिचा आणि अक्षयचा एक फोटो शेअर केला होता.