रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी कधी चित्रपटाची कथा आणि त्या चित्रपटाच्या नायकाची अवस्था एकच असावी. दोघांबद्दलही मनात कणव दाटून यावी, असा योगही जुळून येतो. प्रेक्षकांनी नेमकं कुठल्या गोष्टीचं मोठं दु:ख करावं? कथालेखक आणि दिग्दर्शक दोघांचंही कल्पनाविश्व काही काळ मागेच अडकून बसलं आहे याचं.. त्यांना पुढे जाण्याची वाट सापडत नाही म्हणून काळजी वाटावी. तर आपल्यावर बसलेला तोचतोचपणाचा शिक्का पुसला जावा म्हणून वेगळे विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शकाचा हात धरणाऱ्या त्या बिचाऱ्या कलाकाराची अवस्था चित्रपटापेक्षाही दयनीय होते. एकूणच चित्रपट आणि त्याचा नायक दोघेही एका बंधनात अडकून पडले असावे असा अनुभव आनंद एल. राय दिग्दर्शित ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट देतो.

‘तनू वेड्स मनू’, ‘रांझना’, ‘मनमर्जिया’सारखे चित्रपट देणारे कथालेखक आणि दिग्दर्शक – निर्माता अशी जोडगोळी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. तरीही चार बहिणींचा रखवाला असलेला एकटा भाऊ, त्यांचे लग्न झाल्यावरच स्वत: लग्न करण्याचे त्याने आईला दिलेले वचन, लहानपणापासून त्याच्यावर प्रेम करणारी नायिका असे चावून चोथा झालेले ठोकताळे एकत्र घेऊन हे रक्षाबंधन साजरं करण्यामागचा खटाटोप काही केल्या लक्षात येत नाही. ‘रक्षाबंधन’ची कथा हिमांशू शर्मा आणि कनिका धिल्लाँ या लेखक जोडगोळीने लिहिली आहे. या दोघांनीही स्वतंत्रपणे उत्तम कथानक असलेले चित्रपट दिले आहेत. हिमांशू शर्मा यांनी आनंद राय यांच्याबरोबर ‘तनू वेड्स मनू’चे दोन्ही भाग केले आहेत. तर कनिका यांनी ‘मनमर्जिया’ पासून ‘हसीन दिलरुबा’पर्यंत खूप वेगळय़ा पध्दतीच्या कथा लिहिल्या आहेत. हे दोन दमदार लेखक आणि खुद्द आनंद राय यांच्यासारखा वेगळय़ा धाटणीचे चित्रपट करणारा दिग्दर्शक असूनही असा कधीकाळी हिंदी चित्रपटांतून दाखवून दाखवून थकलेला विषय आणि मांडणीचा चित्रपट द्यावा हे खरंच नवल करायला लावणारं आहे. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? या न्यायाने मग इथे चित्रपटाचा एकमेव मुख्य कलाकार म्हणून अभिनेता अक्षय कुमारच्या अंगावर सगळा दोष टाकता येत नाही. या वर्षभरात ओळीने अपयशी चित्रपट देणाऱ्या अक्षयसाठी ‘रक्षाबंधन’ हा दिलासा देणारा पर्याय ठरू शकला असता. काही प्रमाणात चित्रपटाची रंजक मांडणी अक्षयला तिकीटबारीवर दिलासा देऊ शकते. मात्र त्याच्या पठडीबाज चित्रपटात आणखी एक भर एवढीच या चित्रपटाची नोंद होऊ शकते.

लाला केदारनाथ एक साधासरळ माणूस. त्याचं लग्न व्हायचं आहे, पण त्याच्या चार बहिणींचं लग्न लावून दिल्याशिवाय तो त्याच्या लग्नाचा विचारही करू शकत नाही. लाला त्याच्या वडिलांपासून प्रसिध्द असलेला चांदनी चौकातला पाणीपुरीचा ठेला चालवतो. यापलीकडे त्याचं काही उत्पन्न नाही. ना त्याच्या बहिणी ध्येयाने भारलेल्या वगैरे आहेत. यांच्यापैकी एका बहिणीच्या लग्नाचा विचार जरी करायचा झाला तरी लालाला कमीतकमी १७ ते १८ लाख हुंडय़ासह लग्नाचा खर्च करायचा आहे. एकीला अठरा लाख तर चौंघीचे किती? हा नुसता विचारही भयंकर ठरणाऱ्या लालाची अवस्था खरोखरच वाईट आणि अडचणीची आहे. दुकान गहाण टाकण्यापासून ते किडनी विकण्यापर्यंत सगळं काही करणाऱ्या या चित्रपटाचा नायक आणि त्याच्या चार बहिणींचं अखेर काय होतं? त्याच्या प्रेमाचं काय होतं? याचं उत्तर म्हणजे हा चित्रपट. एकंदरीत कथानक पाहता हुंडाबळी हा चित्रपटाचा विषय आहे हे लक्षात यायला प्रेक्षकांना वेळ लागत नाही. हा विषय या काळात असूच शकत नाही, असंही नाही. मात्र सध्या भाऊ कर्तव्यभावनेने करतो आहे आणि बहिणी फक्त दंगा करत आहेत. घरची परिस्थिती नसतानाही केवळ भावासाठी म्हणून एरव्ही बंडखोर वाटणाऱ्या बहिणी साडी-पारंपरिक ड्रेस परिधान करून चहा-समोसे कार्यक्रमाला उभ्या राहतात, या अशा अनेक गोष्टी किमान आजच्या काळाशी जोडता मनाला पटत नाहीत. बरं हे पटवून घ्यायचं तर अचानक आलेल्या प्रसंगाने या बहिणी पेटून उठतात आणि शिक्षण पूर्ण करून सगळय़ा गोष्टी नीट करतात. इतकं सोपं-सरळ भाबडं आयुष्य असतं हे पटवून घेणं जड जातं. एकूणच कथानकाच्या बाबतीत असलेला गोंधळ कितीही चांगले कलाकार असले तरी निस्तरू शकत नाहीत हे पुन्हा एकदा या चित्रपटाने सिध्द केलं आहे.

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर ही आधीच लोकप्रिय झालेली जोडी थोडय़ाफार फरकाने तेच कपडे-स्वभाव, रंगढंगात वावरताना दिसतात. त्यामुळे एका क्षणी हा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ वा तत्सम अक्षय कुमार स्टाईल सामाजिक पटांचा पुढचा भाग असावा असं वाटत राहतं. अक्षय कुमारचं वय आणि त्याची व्यक्तिरेखा हे गणितही किमान या चित्रपटापुरतं जुळत नाही. बाकी अक्षय आणि भूमीसह चित्रपटातील सगळय़ा कलाकारांनी खूप चांगलं काम केलं आहे. गाण्यांची रेलचेल या चित्रपटात आहे आणि माताँँ का जागरपासून हरएक शैलीची गाणी आहेत. त्यामुळे अगदीच काही नाही तर किमान विनोदाची फोडणी असलेला नावापुरता रंजक चित्रपट म्हणून समाधान मानून घ्यावे लागेल. बाकी तेचतेचपणाचं हे बंधन तोडून बॉलीवूड कधी बाहेर पडणार? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

रक्षाबंधन

दिग्दर्शक – आनंद एल. राय

कलाकार – अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, सादिया खातीब, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत, सहेजमीन कौर, सीमा पहावा, साहिल मेहता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar still bound film of the hero film audience ysh
First published on: 14-08-2022 at 00:02 IST