सलमान खानचा ‘नो एण्ट्री’ १२ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आणि बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट चांगलाच गाजला. तेव्हापासूनच त्याच्या सिक्वलची चर्चा होती. सिक्वलमध्येही सलमानच मुख्य भूमिकेत दिसेल अशी चर्चा होती. मात्र, आता सलमानच्या जागी अक्षय कुमारची वर्णी लागणार असल्याची माहिती ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिली आहे.

‘नो एण्ट्री’च्या सिक्वलची संहिता पूर्ण तयार असून कलाकारांची निवड सुरु असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी निर्माते बोनी कपूर यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, ‘या चित्रपटात काम करण्यासाठी लवकरच सलमानला विचारणार आहोत. सलमान याला होकार देईल, अशी अपेक्षा आहे. पण जर त्याने याला नकार दिला तर मग दुसरे पर्याय शोधू. पण प्राधान्य तर सलमानलाच असेल.’ मात्र आता खिलाडी कुमारला या भुमिकेसाठी विचारण्यात आल्याचं कळतंय. निर्मात्यांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती सांगण्यात आलेली नाही. अनीस बाझमी दिग्दर्शित ‘नो एण्ट्री’मध्ये अनिल कपूर, सलमान, फरदीन खान, लारा दत्ता, ईशा देओल आणि सेलिना जेटली हे कलाकार होते. तर बिपाशा बासू पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत पाहायला मिळालेली होती.

PHOTO : ‘रेस ३’मध्ये असा असेल सलमानचा लूक

सलमानच्या हातात आधीच ‘टायगर जिंदा है’, ‘रेस ३’, ‘दबंग ३’ आणि ‘भारत’ हे चित्रपट आहेत. या व्यग्र वेळापत्रकामुळेच त्याने ‘नो एण्ट्री’च्या सिक्वलला नकार दिल्याचं म्हटलं जात आहे.