‘बॉलिवूड एण्टरटेनर’ अशी प्रतिमा असलेला सुपरस्टार अक्षयकुमार याच्या आगामी चित्रपटाला तात्पुरते शीर्षक ‘एण्टरटेन्मेंट’ असेच देण्यात आले आहे. हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेत चित्रित केला जाणार आहे. मुळातले लेखक असलेले साजिद-फरहाद या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करीत असून अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत असला तरी प्रकाश राज आणि सोनू सूद यांच्याही यात प्रमुख भूमिका असतील.
दक्षिण आफ्रिकेत घडणाऱ्या कथानकात अक्षयकुमारची व्यक्तिरेखा भारतातून तिथे जाते असे दाखविण्यात येणार आहे. आफ्रिकेत गेल्यानंतर अक्षयकुमारच्या व्यक्तिरेखेची भेट प्रकाश राज व सोनू सूद साकारणार असलेल्या दोन सावत्र भावांशी होते असे थोडक्यात कथानक आहे.
या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे आघाडीचा खलनायक अशी बॉलिवूडमध्ये प्रकाश राज याची प्रतिमा बनली असली तरी तो आणि सोनू सूद या दोघांचीही हाणामारीची दृश्ये यात नसतील. खलनायकी छटेच्या भूमिका हे दोघेही साकारणार असूनही कथानकात विनोदी पद्धतीने त्यांना सादर केले जाणार आहे, असे समजते.
अक्षयकुमार-नाना पाटेकर यांच्या भूमिका असलेल्या ‘वेलकम’ या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच साधारण हा चित्रपट असावा, असा अंदाज चित्रपटसृष्टीत व्यक्त करण्यात येत असून लेखकद्वयी साजिद-फरहाद दिग्दर्शनात पदार्पण करीत असल्यामुळे त्यांनी यापूर्वी लिहिलेल्या  ‘चष्मेबद्दूर’, ‘गोलमाल’ चित्रपट मालिकांप्रमाणेच ‘एण्टरटेन्मेंट’ हा चित्रपट निव्वळ आणि निखळ मनोरंजन करणारा असेल अशी अटकळ बांधायला हरकत नाही. जुलैमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून तमन्ना ही ‘हिम्मतवाला’ द्वारे हिंदीत पदार्पण करणारी अभिनेत्रीही प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे समजते.