मिस्टर पर्फेक्शिनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानला दंगलच्या प्रदर्शनाचे जाम टेंशन आले आहे. टेंशन आणि कामामुळे झोपेची वेळ कमी झाली असून केवळ एक तासाचाच वेळ मिळत असल्याचे आमिर खानने म्हटले आहे.
दंगलच्या प्रदर्शनाची तारिख जवळ आली आहे तेव्हा तुला टेंशन येत आहे का असे विचारले असता तो म्हणाला हो ते तर येत आहे. कारण मी गेल्या काही दिवसात केवळ एकच तास झोपत आहे. सकाळी चार-पाच वाजेपर्यंत काम सुरू असतं त्यानंतर एक तास झोपून मी कामाला लागतो असे आमिर खानने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिर खानने वेगवेगळ्या विषयांवर बातचीत केली. आगामी चित्रपट दंगल, त्याचे प्रशिक्षण, ट्विटरवर का नसतो या अनेक बाबींवर त्याने चर्चा केली. आमिर खानचे बहुतांश चित्रपट ख्रिसमसच्या वेळी प्रदर्शित होत असतात. याचे कारण विचारले असता तो म्हणाला, माझ्या बहुतांश चित्रपटांचे चित्रीकरण वर्षाच्या शेवटीलाच संपते. ख्रिसमस आणि दिवाळी हा चित्रपटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ देखील असतो असे तो म्हणाला. ख्रिसमस तुम्हाला लकी आहे का असे विचारला असता तो म्हणाला, माझे चित्रपट लोकांच्या प्रेमामुळे चालले आहेत. त्यामध्ये लकचा प्रश्न येत नाही.

गप्पांच्या ओघात त्याने दंगलसाठी खास प्रशिक्षण कसे घेतले याबद्दल माहिती दिली. दंगलच्या प्रशिक्षणाबरोबरच कसरत, व्यायाम, कुस्तीचा सराव हे तर होतच परंतु दिवसातून तीन-चार तास हरियाणवी शिकण्यात जात असत असे तो म्हणाला. दिवसभर मेहनत करुन हरियाणवी शिकणे हे मोठे आव्हान असल्याचे तो म्हणाला.

हा चित्रपट करीत असताना चित्रपटाचा दिग्दर्शक नितेश तिवारीसोबत कुठल्याही प्रकारचा वाद झाला नसल्याचे त्याने सांगितले. चित्रपट जास्तीत जास्त चांगला व्हावा आणि तो खरा वाटावा असे माझे नेहमी प्रयत्न असतात तेव्हा मी त्याप्रमाणेच सूचना देत असतो. नितेशचं आणि माझं ट्युनिंग चांगलं असल्यामुळे आम्हाला एकमेकांना काय म्हणायचं आहे ते माहित असायचे त्यामुळे आमच्यात काही वाद झालं असं कुणी म्हणत असेल तर त्या अफवा आहेत. असे आमिरने स्पष्ट केले.

दंगलचे ट्रेलर गाजावाजा न करता का लाँच केले असे विचारले असता तो म्हणाला मी कदाचित त्यावेळी इतर कामात व्यस्त असेल त्यामुळेच ते राहून गेले असेल त्या मागे कुठलीही रणनीती नसल्याचे त्याने म्हटले.
आमिर खानचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भरपूर मेहनत घेतो. त्याबद्दल विचारला असता तो म्हणतो प्रमोशन हे चित्रपट निर्मितीचाच भाग आहेत.आम्ही केलेले प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे असे मला वाटते त्यामुळेच मी चित्रपटाच्या प्रदर्शनाइतकेच महत्त्व त्याच्या प्रमोशनला देतो.

मी फार कल्पकतेनी प्रमोशन करतो असे काही लोकांचे म्हणणे आहे परंतु तसे काही नाही. याचे उदाहरण द्यायला गेले तर मी वेशांतर करुन देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होतो. लोकांना असे वाटत होते की ही कल्पकता आहे परंतु खरं पाहायला गेलं तर त्यात कल्पकता नव्हती तर त्या चित्रपटाची कथाच तशी होती.

ट्विटरवर का अॅक्टीव नसतोस असे विचारले असता परफेक्शनिस्ट आमिर म्हणाला की मी एक अंतर्मुख व्यक्ती आहे. ट्विटरचे आजच्या काळातील महत्त्व मी समजू शकतो. ट्विटरमुळे तुम्ही तुमच्या चाहत्यांसोबत संवाद साधू शकतात परंतु मला लोकांमध्ये मिसळणे फारसे जमत नाही. मी माझ्याच कोशात असतो. माझी पत्नी किरण ही सतत मला लोकांमध्ये मिसळण्यासाठी प्रयत्न करते. मी एका वेगळ्याच जगात वावरत असतो तीच मला खेचून पृथ्वीवर परत आणते असे आमिरने म्हटले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amir khan dangal movie release christmas
First published on: 09-12-2016 at 15:53 IST