बच्चन कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण झाल्याने मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेता अभिषेक बच्चनसाठी एका सहकलाकाराने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहीली आहे. अभिषेकला मिठी मारल्यानंतर मी क्वारंटाइनमध्ये जाण्यासही तयार असल्याचं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.

‘ब्रीद’ या वेब सीरिजमध्ये अभिषेकसोबत काम करणारा अभिनेता अमित साधने ही पोस्ट लिहिली आहे. अभिषेकला मोठा भाऊ म्हणत त्याने लिहिलं, ‘गुरू, युवा, बंटी और बबली यांसारख्या चित्रपटांमधून मी त्याला पाहत आलोय, त्याचं अनुकरण करत आलोय. मला तुझे फक्त आभार मानायचे आहेत. सर्वोत्कृष्ट वरिष्ठ कलाकार राहिल्याबद्दल तुझे आभार. तू मोठा आहेस आणि मी लहान आहे, याची जाणीव तू कधी मला करून दिली नाहीस. ब्रीदमधील माझी भूमिका तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तू नेहमी मला प्रेरणा देतोस आणि तुझ्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तू आणि तुझे कुटुंबीय लवकरात लवकर घरी परत येवोत अशी मी प्रार्थना करतो. जेणेकरून आपण दोघं भेटू शकू आणि मी तुला घट्ट मिठी मारू शकेन. त्यानंतर मला दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये राहावं लागलं तरी चालेल. मी महिनाभर क्वारंटाइनमध्ये राहायला तयार आहे.’

https://www.instagram.com/p/CC2tnG2ptdw/

अमित साध आणि अभिषेकने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रीद’ या सीरिजमध्ये एकत्र काम केलं. या सीरिजच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय व आराध्या या चौघांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.