बॉलिवूडचे दोन दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन Amitabh Bachchan आणि ऋषी कपूर हे तब्बल २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार असल्याचे वृत्त आम्ही काही दिवसांपूर्वीच दिले होते. ‘अमर अकबर अँथनी’, ‘अजूबा’ आणि ‘नसीब’ यांसारखे हिट चित्रपट दिल्यानंतर ही जोडीगोळी आता ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. चित्रपटाची खास बाब म्हणजे यात अमिताभ हे ऋषीजींच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

रोमॅण्टिक विनोदीपट असलेल्या ‘१०२ नॉट आउट’ चित्रपटात अमिताभ १०२ वर्षांचे तर ऋषी ७५ वर्षांचे दाखविण्यात येणार आहेत. सौम्या जोशीच्या याच नावाच्या गुजराती नाटकावर चित्रपटाची कथा आधारित आहे. वडील-मुलामधील प्रेमळ आणि खोडकर नाते यातून उलगडण्यात येणार आहे. चित्रीकरणाला सुरुवात होताच या नटखट पिता-पुत्राच्या जोडीचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

ऋषी कपूर Rishi Kapoor यांनी स्वतः अमिताभ यांच्यासोबत काम करणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती. अमिताभ यांचा फोटो ट्विट करत त्यांनी लिहिलेलं की, ‘या अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच सुखद असतो. टीमसोबत आगामी चित्रपटाची कथा वाचण्यास सुरुवात केलीय.’ या दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी आणि त्यांच्या अभिनयाचा आस्वाद घेण्याची पर्वणीच त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.

अमिताभ आणि ऋषी कपूर पहिल्यांदाच गुजराती व्यक्तिरेखा साकारणार आहेत. बिग बींनी बुधवारपासून चित्रीकरणाला सुरुवात केली असून, इतर कलाकार या महिन्याअखेरपर्यंत कामास सुरुवात करतील. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण मुंबईतच होणार आहे. संपूर्ण चित्रीकरण जुलै महिना संपेपर्यंत पूर्ण करण्याचा टीमचा मानस आहे.