अमिताभ बच्चन छोटय़ा पडद्यावर काल्पनिक मालिकेत दिसणार, ही घोषणा खुद्द बिग बींनी करून आता वर्ष उलटले असेल. अमिताभ बच्चन यांची ही मालिका अनुराग कश्यप दिग्दर्शित करणार असल्याने तर या मालिकेबाबतची उत्सुकता अधिक वाढली होती. मात्र, अमिताभ, अनुराग आणि सोनी टीव्ही यांनी वर्षभर पाळलेले मौन आता संपले असून या मालिकेचे नावही त्यांनी जाहीर केले आहे. एवढेच नाही तर मालिकेचे प्रोमोजही झळकले आहेत.
अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचे नाव ‘युद्ध’ ठेवण्यात आले आहे. अमिताभ या मालिकेत युधिष्ठीर नावाच्या उद्योजकाची भूमिका करत आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखेच्या नावावरून मालिकेचे नाव ‘युद्ध’ असे ठेवण्यात आले असून कॉर्पोरेट विश्वातील उद्योजक म्हणून असलेली लढाई आणि त्याचवेळी वैयक्ति आयुष्य जपण्यासाठीची लढाई, असा या मालिकेचा विषय आहे. या मालिके चे दिग्दर्शन अनुराग कश्यपचे आहेच. पण, मालिका म्हणून काही भाग हे ‘मद्रास कॅफे’ फे म शुजित सिरकारने दिग्दर्शित केले आहेत.
अमिताभ यांच्याबरोबर के. के. मेनन, नवाजुद्दिन सिद्दीकी आणि अभिनेत्री सारिका यांच्या या मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत. छोटय़ा पडद्यावर मालिको करताना चित्रिकरणासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्यातही मालिका काल्पनिक असल्याने एखाद्या रिअ‍ॅलिटी शोपेक्षा या मालिकेला जास्त वेळ चित्रिकरणाला द्यावा लागतो. मात्र, छोटय़ा पडद्यावर मालिके तून पहिल्यांदाच पदार्पण करत असल्याने अमिताभ बच्चन यांनी वेळेची कुठलीही तक्रार न करता चित्रिकरणात सहभाग घेतला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. ही मालिका कधी प्रदर्शित होणार हे अजून गुलदस्त्यात असले तरी त्याचे प्रोमो झळकले आहेत. या मालिकेबरोबरच अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’चे नवे पर्व सुरू होईल. शिवाय, जया बच्चन यांची मालिकाही पुढच्या सहा महिन्यात प्रदर्शित होणार असल्याने सोनी टीव्हीवर केवळ ‘बच्चन’ बोल दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan as yudhisthira
First published on: 04-06-2014 at 06:28 IST