बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याच्या आगामी ‘सरकार ३’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘अँग्रीयर दॅन एव्हर’ या टॅगलाइनला साजेसा असा ‘सरकार ३’चा पोस्टर आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार असलेले अमिताभ बच्चन, यामी गौतम, जॅकी श्रॉफ, मनोज बाजपेई आणि अमित संध यांच्या चेह-यावर रागिष्ट भाव या पोस्टरवर पहावयास मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सरकार’ या सिरीजमधील ‘सरकार ३’ हा तिसरा चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सर्व प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन हे या चित्रपटातही सुभाष नागरेच्या (सरकार) मुख्य भूमिकेत दिसतील. या चित्रपटातील त्यांच्या लूकने आधीच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. अभिनेता मनोज बाजपेईची देखील यात प्रभावी भूमिका असून अभिनेत्री यामी गौतम अगदी साध्या भूमिकेत दिसणार आहे. आधीच्या चित्रपटांप्रमाणे यामी यात ग्लॅमरस रुपात दिसणार नाही. ती यात अन्नू करकरे ही व्यक्तिरेखा साकारत आहे. रोनीत रॉय हा पराग त्यागीची भूमिका साकारत असून अमित सध हा शिवाजी (चिकू) नागरेच्या भूमिकेत दिसेल. भरत दाभोळकर यात गोरख रामपूरच्या भूमिकेत तर रोहिणी हट्टंगडी या रुक्कू बाई देवीच्या भूमिकेत दिसतील. राम गोपाल दिग्दर्शित ‘सरकार ३’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होईल.

दरम्यान, सरकार ३ च्या ट्रेलर अनावरणासाठी अमिताभ बच्चन यांनी चक्क राणी ‘एलिझाबेथ २’चे आमंत्रण नाकारल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी आले होते. अमिताभ बच्चन यांना क्वीन एलिझाबेथ २ आणि प्रिन्स फिलीप यांनी बकिंगहम पॅलेसमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिले होते. पण, बिग बी तेथे न जाण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. या महिन्याच्या अखेरीस बकिंगहम पॅलेसमध्ये होणा-या भारत-इंग्लंड सांस्कृतिक कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांनी नाकारले आहे. ९० वर्षीय राणी एलिझाबेथ २ यांनी दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मिड डेने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांनी कामासाठी आधिच तारखा दिल्या असल्यामुळे ते लंडन येथे होणा-या गालामध्ये जाऊ शकणार नाहीयेत. पण, त्यांनी आधीच याबाद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, या सन्मानाबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत. मात्र, सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असलेल्या अमिताभ यांनी याबद्दल कोणतीच माहिती अद्याप दिलेली नाही.

बिग बींनी इतके मोठे आमंत्रण नाकारण्यामागचे नेमके कारण काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न इंडियन एक्स्प्रेस संकेतस्थळाने केला. तेव्हा कळलं की, राम गोपाल वर्मा याच्या ‘सरकार ३’ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण कार्यक्रमाची ते तयारी करत आहेत. तसेच, ते लवकरच आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करणार आहेत. याव्यतिरीक्त ते अयान मुखर्जीच्या ‘ड्रॅगॉन’ चित्रपटातही झळकणार आहेत. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्या भूमिका आहेत. तसेच, ते गौरांग दोशीच्या ‘आँखे २’ चित्रपटातही काम करत आहेत. त्यामुळे अमिताभ यांचे वेळापत्रक पूर्णपणे कामाने भरल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan is back angrier than ever sarkar 3 first look
First published on: 27-02-2017 at 20:42 IST