आपल्या तणावपूर्ण दिनचर्येमुळे आणि कामाप्रतीच्या बांधिलकीमुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या झोपही कमीच घेताहेत. बॉलिवूडमधील या ७१ वर्षीय महानायकाने अलिकडेच ‘भूतनाथ रिटर्नस्’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले. या चित्रपटाच्या टीमसोबत त्यांनी पहाटे पाच वाजेपर्यंत पार्टी केल्यानंतर रायगडला जाण्याआधी केवळ तासाभराची झोप घेतली.
याविषयी ब्लॉगवर ते लिहितात, भूतनाथ टिमबरोबरची लोणावळा येथील काल रात्रीची पार्टी खूप उशीरापर्यंत चालली… झोपायला जवळजवळ पहाटेचे पाच वाजले, रायगडला जाण्यासाठी पुन्हा सकाळी ६ वाजता उठलो. हेलिकॉप्टरने हा प्रवास एक तासाचा आहे, ग्रामीण लोकांसाठी ‘स्वदेश फाऊन्डेशन’ करत असलेले काम मला आवर्जून पाहायचे आहे. काही अंतरावरच असलेल्या या ठिकाणी विजेचा अभाव असून सुखाची झोप मिळणे देखील दुरापास्त आहे.
आपल्या नवीन उपक्रमाबाबत बोलताना आणि आपले अनुभव कथन करताना अमिताभ म्हणतात, गावकऱ्यांमध्ये राहून त्यांचे जीवन अनुभवणे, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांनी परिश्रमपूर्वक राबवलेल्या योजना समजून घेणे, हा फार सुखद अनुभव होता. रॉनी आणि झरिन स्क्रुवाला हे दोघे ‘स्वदेश फाऊन्डेशन’चे काम पाहतात. संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी निधी गोळा करून समाजातील दुर्लक्षितांना सोयी-सुविधा पुरविण्याच्या त्यांच्या या कामात मी सुद्धा सहभागी होणार आहे. सर्व सुखसोयी बाजूला ठेऊन मुलभूत गरजा भागविण्यासाठीच्या साधनांची कमतरता असलेल्यांबरोबर राहण्याचा अनुभव देखील अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये कथन केला. बिग बी लिहितात, शहरात सर्व सुखसोयींनी युक्त असे जीवन जगत असताना जीवनातील मुलभूत गरजांचा आपल्याला विसर पडतो. ज्या प्रकारचे सुखसोयींनी युक्त आयुष्य आपण जगत आहोत ते लज्जास्पद आहे. त्यांच्या आयुष्यातील प्राथमिक आवश्यक गोष्टींचा अभाव पाहून आश्चर्य वाटले. असे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, ते आपले वास्तव्य जपून आहेत आणि स्वत:च्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी अविरत परिश्रम करीत आहेत. खरोखर हे असामान्य आहे!
ब्लॉगमधील लिखाण संपवताना बिग बी लिहितात, झोप अनावर झाल्याने अधिक काही लिहू शकत नाही… परंतु सांगण्यासारखे बरेच काही आहे… आणि करण्यासारखे देखील…