बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कूली’ चित्रपटादरम्यानचा किस्सा सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटादरम्यान बिग बींना गंभीर दुखापत झाली होती. या घटनेला ३५ वर्ष झाली असून चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनांमुळेच मी बरा झालो असं म्हणत त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. अमिताभ यांच्या कोट्यवधी चाहत्यांनी  त्यावेळी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या होत्या.

चाहत्यांच्या या प्रेमासाठी बिग बींनी त्यांचे आभार मानले आहेत. ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी लिहिले की, ‘मी मृत्यूच्या दाढेत होतो, मात्र प्रार्थनांनी मला वाचवलं.’ जुलै १९८२ मध्ये चित्रपटातील एक साहसदृष्य करताना अमिताभ यांना दुखापत झाली होती. दृष्याचे चित्रीकरण करताना बिग बींच्या पोटात टेबलाचा कोपरा लागला आणि गंभीर जखम झाली होती. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांना ताबडतोब दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती खूप नाजूक होती असं म्हटलं जातं. अमिताभ बच्चन वाचतील की नाही असा प्रश्नच निर्माण झाला होता. मात्र २ ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी एड्रेनलाइन इंजेक्शन थेट त्यांच्या हृदयात लावली.