आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. पण यंदा करोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता आले नाही. अशातच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशी निमित्त चाहत्यांना मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ यांनी इन्स्टाग्राम आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी विठ्ठल रखुमाईचा फोटो शेअर छान असे कॅप्शन दिले आहे. ‘देवषयनी #आषाढीएकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना ,वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा !!’ असे त्यांनी म्हटले आहे.

आषाढीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करुन वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते. पण यंदा करोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता आले नाही.