रविवारच्या सुट्टीच्या दिवशी लोकलमधील प्रवास हा खरे म्हणजे नेहमीच्या गर्दीतला प्रवास नसल्याने काहीसा शांत आणि कंटाळवाणा म्हणता येईल असा असतो. मात्र, सीएसटीहून कल्याणच्या दिशेने निघालेल्या एका लोकल ट्रेनमधील प्रवाशांसाठी रविवारचा प्रवास हा ‘बिग’ आश्चर्याचा होता. त्यांच्या लोकलमध्ये खुद्द महानायक अमिताभ बच्चन उपस्थित होते. लोकलमधील काही तरुण मुलांबरोबर अमिताभ यांनी सीएसटी ते मुलुंड असा सुरेल प्रवास केला. ‘आज की रात है जिंदगी’ या आपल्या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील शोसाठी अमिताभ यांनी केलेला आजचा ‘लोकल’ प्रवास ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौरभ निंभकर नावाच्या तेवीस वर्षांच्या तरुण गायकासाठी अमिताभ यांनी हा खास लोकलचा प्रवास केला. अंबरनाथ येथील एका औषधांच्या कंपनीत काम करणारा सौरभ आपल्या कामाच्या वेळा सांभाळून अंबरनाथ ते दादर असा लोकल प्रवास करतो. या प्रवासात सौरभ गिटारवर गाणी वाजवतो. दादरवरून पुन्हा डोंबिवलीपर्यंत त्याचा हा परतीचा सुरेल प्रवास असतो. या गाण्यातून महिन्याकाठी सौरभकडे सहा ते सात हजार रुपये जमा होतात. हे पैसे तो ठाण्यातील कर्क रोग पीडितांसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेला दान करतो. समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या या खऱ्याखुऱ्या ‘हिरो’ला सलामी देण्यासाठी अमिताभ बच्चन आणि अभिनेता हुसैन कुवाजेरवाला यांनी सौरभबरोबर रविवारी सीएसटी ते मुलुंड असा गाणी गात लोकल प्रवास केला.
कर्करोगामुळे सौरभच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून कर्करोग पीडितांसाठी आपल्या गायनातून आर्थिक मदत उभी करण्याचा ध्यास सौरभने घेतला. सौरभची ही कहाणी अमिताभ यांच्या कानावर पडली तेव्हा ते भारावून गेले. सौरभच्या या धैर्याचे, त्याच्या कार्याचे अमिताभ बच्चन यांना कौतुक वाटले आणि ‘आज की रात है जिंदगी’ या शोमध्ये सौरभचाही गौरव करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, शोचा हा भाग सौरभबरोबर लोकलमध्येच चित्रित व्हावा, अशी अमिताभ यांची इच्छा होती. सौरभबरोबरची अमिताभ यांची ही लोकलवारी या आठवडय़ाच्या अखेरीस ‘आज की रात है जिंदगी’मध्ये पाहायला मिळणार असल्याचे वाहिनीच्या सूत्रांनी सांगितले.
ठाण्यातील कर्क रोग पीडितांसाठी काम करणाऱ्या सौरभ निंभकर या तरुणाबरोबर अमिताभ बच्चन यांनी रविवारी लोकलमधून प्रवास केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh travel by train
First published on: 16-11-2015 at 05:57 IST