‘शरीर हे नश्वर आहे तर आत्मा हा अमर आहे.’ अध्यात्मात सांगितल्या गेलेल्या या संकल्पनेचा बऱ्याचदा चुकीचा अर्थ काढला जातो. असेच काहीसे सुपरस्टार एमी वाइनहाउसच्या वडिलांच्या बाबतीतही झाले आहे. म्हणूनच त्यांनी सहा वर्षांपूर्वी निधन झालेल्या आपल्या मुलीला पुनर्जीवित करण्याच्या प्रयत्नात आपण असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. २३ जुलै २०११ साली अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे पॉपस्टार एमी वाइनहाउसचे निधन झाले. अचानक झालेल्या मृत्यूचा तिच्या वडिलांनी जबरदस्त धसका घेतला होता. सध्या सुरू असलेल्या त्यांच्या काही कृतींमुळे बहुधा ते या धक्क्यातून अद्याप सावरले नसल्याचे दिसून येत आहे.लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या एमीचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर तिने संगीत क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवले. सर्वात कमी वयात सात ग्रॅमी पुरस्कारांवर नाव कोरणारी ती जगातील पाचवी गायिका ठरली. परंतु जितक्या वेगाने तिने यशाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली तितक्याच वेगाने ती खाली आली. २००७ नंतर तिच्या कारकिर्दीचा उतरता काळ सुरू झाला. यातून सावरणे तिला शक्य झाले नाही. परिणामी अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या एमीचा मृतदेह २०११ साली तिच्या राहत्या घरी सापडला.एमीच्या वडिलांच्या मते तिचे शरीर जरी नष्ट झाले असले तरी तिचा आत्मा अद्याप इथेच आहे. रोज कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांना त्यांची मुलगी भेटायला येते. बऱ्याचदा ती एका काळ्या पक्षाच्या रूपात भेटायला येते. तिचा अत्मा घरात आल्यावर एका विशिष्ट प्रकारची शांतता त्यांना जाणवते. तो पक्षी जेव्हा ओरडतो तेव्हा त्यांना आपल्या मुलीचा मधुर आवाज ऐकू येतो, असा दावा करणाऱ्या एमीच्या वडिलांच्या मते तिचा आत्मा नवीन शरीराच्या शोधात आहे. असे काही आश्चर्यचकित करणारे दावे एमी वाइनहाउसच्या वडिलांनी केले आहेत, शिवाय तिला जिवंत करण्यासाठी सध्या तांत्रिक विद्यांचाही ते आधार घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2018 रोजी प्रकाशित
म्हणे.. त्या मृत गायिकेचा आत्मा काळ्या पक्षात
सहा वर्षांपूर्वी निधन झालेल्या आपल्या मुलीला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न
Written by मंदार गुरव
Updated:

First published on: 14-01-2018 at 01:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amy winehouses father claims singers ghost visits him hollywood katta part 92 hollywood katta