‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमधील राहत्या २९ जुलै रोजी गळफास लावून आत्महत्या केली. आशुतोष मागील काही दिवसांपासून नैराश्येच्या समस्येचा सामना करत असल्याने त्यामधूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नंतर समोर आली होती. मात्र आता अशुतोषची आई आणि मुयरीच्या सासू अनुराधा भाकरे यांनी सोशल मिडियावर आशुतोषसोबत नक्की काय घडलं आणि तो कशाप्रकारे नैसाश्येचा समाना करत होता यासंदर्भात एक पोस्ट लिहिली असून ‘नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार आहे, त्याकडे दुर्लक्ष करु नका’ असं आवाहन केलं आहे.

लॉकडाउनमुळे आशुतोष आणि मयुरी हे दोघे त्यांच्या नांदेडमधील घरीच राहत होते. आशुतोषची आई आणि मयुरी गप्पा मारत असतानाच आशुतोष वरच्या खोलीमध्ये होता. बराच वेळ तो खाली न आल्याने घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आलं. आशुतोषच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मात्र आता हळूहळू त्याचे कुटुंबिय यामधू सावरत आहेत. मंगळवारी आशुतोषचा वाढदिवस होता. याच निमित्त त्याच्या आईने सर्वांना नैराश्येकडे गांभीर्याने पाहण्याची विनंती केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. काय म्हणाली आहे आशुतोषची आई, पाहुयात त्यांची पोस्ट जशीच्या तशी…

आज ११ ऑगस्ट, आशुचा ३२ वा वाढदिवस. आज आशुला जाऊन तेरा दिवस झालेत. गेल्या तेरा दिवसात त्याच्या आठवणी आल्या नाहीत असा एकही क्षण गेला नाही. त्याचे बालपण, शाळा, काॅलेज, माॅडेलिंग व पिक्चर आणि बिझीनेससाठी मुंबईला जाणे, लग्न, लग्नानंतरची साडेचार वर्ष हे सारे डोळ्यासमोरुन तरळून जाते. त्यातल्या त्यात तो नैराश्यात (Depression) गेल्यानंतर सगळ्यांनी त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न आठवतात. मी ,मयुरी, त्याचे वडील डाॅ. भाकरे, त्याचा अमेरिकेतील लहान भाऊ अभिलाष, आजी, मामा , मामी, मयुरीचे आई व वडील मयुरीचे दोन्ही भाऊ-वहिन्या, मयुरीचे व आशु चे मित्र व मैत्रिणी, नांदेड मुंबई येथील मनोविकार तज्ञ डाॅक्टर्स ह्या सर्वांनी आपापल्या परीने त्याला नैराश्यातून बाहेर काढणेचे खूप प्रयत्न केलेत. सगळे खूप सपोर्टीव्ह होते. मयुरी कायम मला म्हणायची मम्मी आपण आशूला यातून बाहेर काढूच, काळजी करू नका.

आशु योग्य प्रतिसाद ही देत होता. त्यासाठी मयुरीने मागील दोन वर्षात तिला आलेल्या खूप सिरियलस नाकारल्यात कारण सिरियल म्हटली म्हणजे दररोज सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत व्यस्त रहाणे. केवळ आशुच्या आग्रहाखातर नाट्य व सिनेसृष्टीशी टच राहावा म्हणून एखादे नाटक व सिनेमा स्वीकारला. ह्या काळात मयुरीने त्याच्या पत्नीच्या व्यतिरिक्त त्याची मैत्रिण, मार्गदर्शक, आणि विशेष म्हणजे त्याची आई होऊन लहान बाळाप्रमाणे काळजी घेतली. लाॅकडाऊन मध्ये २५ मार्चपासून ते ३० जूनला मयुरी व आशु नांदेडला येईपर्यंत देशमुख परिवारातील आशु व मयुरीसह नऊ सदस्य एकत्रित राहत. रात्री जेवणानंतर करमणुकीसाठी पत्ते, ऊनो, लुडो, डम्ब शेराज, कॅरम, ई. असा दिनक्रम होता. आशु व मयुरी स्वयंपाक घरात विविध प्रयोग करत. ह्या काळात मयुरीचे सर्व व्हिडिओजचे शूटींग आशुनेच केले. मयुरी त्याच्याकडून त्याच्या कलाने प्राणायम, मेडिटेशन करुन घेत असे. ३० जूनला नांदेड ला मयुरी व आशु आले तेव्हा आशुने स्वत: पाचशे किलोमीटर गाडी चालविली. आशु व मयुरी दोघे नांदेडला आल्यावर देखील स्वयंपाक घरात वेगवेगळे प्रयोग, करमणुकीसाठी पत्ते ,लुडो ,कॅरम. तसेच चित्रपटसृष्टीशी संबधीत ऑनलाईन क्लासेस, प्राणायम, मेडिटेशन ई. दिनचर्या सुरू होतीच. तो बऱ्यापैकी रिकव्हर होत होता. पत्त्यांच्या जजमेंट ह्या गेम मध्ये तो ८०% वेळा जिंकायचा. तो असे काही करेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण आम्हा सर्वांची नजर चुकवून तो गेला.

आमचा मुलगा म्हणून मी व डाॅक्टर भाकरेंनी आशुची सर्व काळजी घेतलीच पण आशुच्या सासू सासऱ्यांनीही तेवढीच काळजी घेतली. मयुरीच्या आई हेमाताईंनी आशुला स्वत:च्या मुलाप्रमाणे जपले. त्याचे सासरे देशमुख साहेब यांचे आग्रहाखातर आशु , मी, डाॅक्टर भाकरे साहेब व देशमुख साहेब असे आम्ही चौघांनी डिसेंबर २०१९ मध्ये शेगाव येथे मानस योग साधनेचे सात दिवसीय शिबीर केले. तेथे व तद् नंतर ही आशुमध्ये फरक जाणवला. सर्वांनी सर्व प्रयत्न केलेत, पण देवाच्या मनात काही वेगळेच होते.

आणखी वाचा- “आशुडा…गुणी बाळ माझं ते,” पतीच्या आत्महत्येनंतर मयुरी देशमुखची भावूक पोस्ट

आशुच्या दहाव्याच्या कार्यक्रमानंतर रितीरिवाजानुसार मयुरीला तिच्या आई वडिलांबरोबर पाठवावे असे सर्व नातेवाईक यांचे म्हणणेप्रमाणे ठरले. घाटावरून दहाव्याचा कार्यक्रम आटोपून सर्व नातेवाईक परतल्यानंतर सर्वांसमोर मयुरीने तिच्या आई वडिलांना सांगितले की रुढीपरंपरेनुसार मी तुमचे बरोबर यायला पाहिजे, पण इथे मम्मी व पप्पा एकटेच पडतील. अभिलाष देखील दूर अमेरिकेत आहे. आता त्यांना माझी गरज जास्त आहे त्यामुळे मी त्यांच्या जवळ नांदेड येथेच थांबते. मी तुमच्याकडे येताना त्यांना दहा पंधरा दिवसांसाठी घेवून येते. केवढी ही प्रगल्भता इतक्या कमी वयात ह्या माझ्या मुलीत (मला दोन्ही मुलंच असलेने मयुरीला मी कधीच सून मानले नाही.) ती आमची सून नसून मुलगीच आहे हे मला तेव्हा प्रकर्षांने जाणवले.

परवा मी मयुरीला माझ्या लहान मुलाला फोन वर बोलतांना ऐकलं, ती त्याला समजावताना म्हणाली, “आम्ही सर्व इथे आहोत. तू तिकडे अमेरिकेत एकटा आहेस. अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि काळजी घे,” इतके सामंजस्य कुठून येते ह्याचे मला आश्चर्य वाटले.

आज आशुचा वाढदिवस, पण माझी अतोनात इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी डिप्रेशन ह्या गंभीर आजारावर गांभीर्याने विचार करावा म्हणुन मी लिहीत आहे. आईचे दुःख तर खूप आहे पण आम्ही सर्वांनी आणि खास करून मयुरीनी केलेल्या प्रयत्नांनी आशु खूप बरा झालेला. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आशुला मदत करण्यासाठी इतके लोक होते त्याचे वडील स्वत: एम. एस. डाॅक्टर, पत्नी, सासू-सासरे उच्च शिक्षित, सर्व नातेवाईक, मित्र-मैत्रिणी समंजस, सपोर्टीव्ह पण आम्हाला न कळू देता आम्हाला सोडून गेला. आजच्या स्पर्धेच्या युगात नैराश्यग्रस्तांची (Depression) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या कुटुंबात ही अशी व्यक्ती असू शकते. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करु नका. त्याला बोलतं करा, त्याला सपोर्ट करा आणि मनोविकार तज्ञांच्या ट्रीटमेंटसाठी प्रोत्साहित करा.

मेंदू हा सर्वात जास्तं काम करतो मग त्याची निगा पण तितकीच ठेवली पहिजे. आपण कॅन्सर किंवा हृदय विकार असलेल्या व्यक्तींकडे ज्या प्रेमाने आपुलकीने हात देतो, डॉक्टरकडे नेतो तितकीच काळजी आणि आधाराची गरज मानसिक त्रासात असणार्‍या व्यक्तीला असते. त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि समजून घ्या.

नैराश्याला चेहरा नसतो, नाहीतर सर्वांना हसवणारा, नेहमी मदत करणारा आशु असं करूच नसता शकला. ह्या विषयावर गांभीर्याने विचार आणि चर्चा केली पाहिजे तरच आपण अशा नैराश्याच्या रुग्णांना मदत करू शकू. नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार, त्याकडे दुर्लक्ष करु नका. एकमेकांना मदत करा मानसिक आधार द्या , रुग्ण नक्कीच बरा होवू शकतो. ह्या रुग्णांकडे सकारत्मकतेने पहा हीच एका आईची विनंती.

– सौ. अनुराधा गोविंदराव भाकरे

मयुरीने २० जानेवारी २०१६ रोजी आशुतोषबरोबर लग्न केलं होतं. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे.