‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचा ट्रेलर, त्यानंतर प्रदर्शित झालेलं ‘उल्लू का पठ्ठा’ हे गाणं आणि त्याहीनंतर प्रदर्शित करण्यात आलेल्या बिहाइंड द सीन्सचा व्हिडिओ प्रचंड गाजत आहेत. रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या नात्यात दुरावा आल्यानंतरही त्यांची केमिस्ट्री कशी असेल याची झलक ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळत आहे. अरिजित सिंगने गायलेल्या या गाण्याचं एकंदर चित्रीकरण पाहता मोरक्कोच्या गल्लीबोळामध्ये हे गाणं चित्रीत करण्यात आल्याचं लक्षात येतं.

‘उल्लू का पठ्ठा’ या गाण्याचा एक भाग म्हणून रणबीरला रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या स्थानिकांकडे पैसे मागावे लागणार होते. त्यामुळे सरावासाठी का असेना पण, रणबीरने चक्क मोरक्कोमध्ये भीक मागितली होती. त्यामुळे फक्त कॅमेऱ्यासमोरच नाही तर, कॅमेऱ्याच्या मागेही भारतातील हा स्टार अभिनेता मोरक्कोत भिकारी झाला अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. किंबहुना रणबीरच्या आयुष्यातही हा असा अनुभव पहिल्यांदाच आला असेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दृश्याच्या चित्रीकरणाआधी दिग्दर्शक अनुराग बासू आणि त्यांच्या टीमच्या काही सदस्यांनी मोरक्कोच्या रस्त्यांवर एक फेरी मारली. तेव्हा तेथील रस्ते बऱ्यापैकी गजबजलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी बरीच गर्दी त्या ठिकाणी गोळा झाली. त्यावेळी गर्दी झाल्याचं पाहता अनुराग बासूच्या सांगण्यावरुन ‘रॉकस्टार’ रणबीरने मोरक्कोवासियांकडे चक्क भीक मागितली.

 वाचा : अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

याविषयीची माहिती देत अनुराग बासू म्हणाला, ‘हो हे खरंय. मी रणबीरला भीक मागायला भाग पाडलं. गाण्याचा भाग म्हणून मी त्याला असं करायला भाग पाडलं. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी दिलेल्या पैशांतून २५०-३०० दिराम रणबीरकडे जमा झाले. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर गाण्यात रणबीर खरोखर लोकांकडे पैसे मागत आहे.’ रणबीरच्या चित्रपटासाठीची ही अनोखी शक्कल आणि चित्रपटाचं हटके कथानक पाहता सध्या या चित्रपटाबद्दल उत्सुकतेचं वातारण पाहायला मिळत आहे. ‘डिस्नी’ आणि ‘पिक्चर शुरु प्रॉडक्शन’ची निर्मिती असलेला ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा: VIDEO: ‘जग्गा जासूस’च्या सेटवर रणबीर- कॅटला ‘याड लागलं’