scorecardresearch

नाटय़ परिषदेच्या कलेवरात प्राण कोण फुंकणार?

आता निवडून येणाऱ्या मंडळींना  शोधायची आहेत. मुख्य म्हणजे नाटय़ परिषदेचं यशवंतराव चव्हाण नाटय़संकुल गेली तीनेक वर्षे बंदच आहे.

akhil bharatiya marathi natya parishad election
नाटय़ परिषद

रवींद्र पाथरे

‘नेमेचि येतो..’ च्या धर्तीवर अ. भा. मराठी नाटय़ परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसांत येऊ घातली आहे. नाटय़ परिषदेची निवडणूक म्हणजे आरोप – प्रत्यारोपांचा धुरळा उडणारच. परंतु या वर्षी त्याचं प्रमाण फारच कमी आहे. जी काही चिखलफेक करावयाची होती, कोर्टबाजी करायची होती ती यापूर्वीच यथेच्छ झालेली आहे. सद्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल करोनामुळे वाया गेला आणि त्यानेच अनेक प्रश्नही निर्माण केले; ज्यांची उत्तरं आता निवडून येणाऱ्या मंडळींना  शोधायची आहेत. मुख्य म्हणजे नाटय़ परिषदेचं यशवंतराव चव्हाण नाटय़संकुल गेली तीनेक वर्षे बंदच आहे. आधी करोनामुळे आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’च्या अभावामुळे ते बंद पडले आहे. त्यामुळे त्याची काय वाट लागलीय याची शहानिशा करून ते मुळात सुरू करता येईल का, हे पाहावं लागेल. नाही तर ते पाडून बहुमजली संकुल उभं करण्याचा विद्यमान अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचा मानस प्रत्यक्षात आणावा लागेल. ते तर महामुश्कीलच आहे. आधी हेच नाटय़संकुल उभं राहता राहता नाकी नऊ आले होते. आता ते पाडून नवं नाटय़संकुल उभं करणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखंच आहे. तशात नाटय़ परिषदेचे हितकर्ते शरद पवार सत्तेत नाहीयेत. त्यामुळे एवढा प्रचंड पैसा कोण आणि कसा उभा करणार, हा प्रश्नच आहे. एखाद्या बिल्डरला ते विकसित करायला द्यावे, तर ‘रंगशारदा’ सारखी त्याची अवस्था होणारच नाही याची खात्री देता येत नाही. म्हणजेच उंट तंबूत आणि मालक बाहेर उन्हात! असो.

नाटय़ परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी परिषदेतील लाथाळय़ा आणि कोर्टबाजीला कंटाळून ‘आपण यापुढे संस्थात्मक राजकारणात सहभाग घेणार नाही’, असं जाहीर केलं होतं. त्यामुळे अनेकांना आता निवडणुकीचं मैदान आपल्यासाठी मोकळं आहे असं वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी आपलं पॅनल तयार करून शड्डू ठोकले होते. परिणामी यावेळची निवडणूक कोणत्याही हाणामाऱ्यांशिवाय होईल अशी आशा निर्माण झाली होती. परंतु कसचं काय? प्रसाद कांबळी यांनी पुन्हा आपलं पॅनल तयार करून निवडणूक मैदानात उडी ठोकली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. गेली तीन वर्षे प्रसाद कांबळी आणि मंडळींना करोना साथीतील मदत वाटप आणि त्यांचा मनमानी, हेकेखोर कारभार या विरोधात नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळातील काहींनी सळो की पळो करून सोडलं होतं. आरोप प्रत्यारोप, चिखलफेक, राडारोडा, कोर्टबाजी यांना ऊत आलेला होता. काही उपटसुंभ पत्रकारही या आगीत तेल ओतण्याचं काम इमानेइतबारे करत होते. त्यांना आपण ‘किंग मेकर’ आहोत असा भास व्हायला लागला होता. परंतु शरद पवारांनी उभय बाजूंची मीटिंग घेऊन ही भडकलेली आग शांत केली होती. त्यात ‘तडजोडीच्या अटी’ काय होत्या हे गुलदस्त्यातच आहे. परंतु कानोकानी खबरीनुसार (हे सत्य की असत्य?), प्रसाद कांबळी यांनी याउप्पर निवडणूक लढवायची नाही, या अटीवर विरोधकांनी माघार घेतली होती असं म्हणतात.

परंतु आता प्रसाद कांबळीही आपलं पॅनल बनवून निवडणूक आखाडय़ात उतरले आहेत, याचा अर्थ त्यात तथ्य नसावं.

या निवडणुकीत कोण निवडून येईल, न येईल याच्याशी नाटय़रसिकांना  फारसं देणं घेणं नाही. परंतु गेल्या काही वर्षांत नाटय़ परिषद हळूहळू मृतप्राय झाली आहे त्याबद्दल मात्र नक्कीच चिंता करण्याची बाब आहे. आधीच नाटय़संमेलन आणि कै. गो. ब. देवल स्मृतिदिनाचा कार्यक्रम याव्यतिरिक्त नाटय़ परिषदेचं अस्तित्व जाणवत नसे. तशात या दोन्ही गोष्टी ठप्प झाल्या आहेत. नाटय़ परिषदेचं   शतकमहोत्सवी नाटय़ संमेलन गेली तीन वर्षे रखडलं आहे. (दरम्यानच्या काळात तीन साहित्य संमेलनं मात्र धूमधडाक्यात पार पडली. करोनाचं सावट असूनदेखील!) नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आपल्या हाती पदाची सूत्रं कधी येणार याची वाट पाहून पाहून ताटकळले आहेत. रसिकही या संमेलनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. रंगभूमीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. आणि त्याचे आपण साक्षीदार व्हावे ही आस रसिकांच्या मनाला लागलेली आहे. ती कधी पुरी होणार, हे नव्यानं निवडून येणारी मंडळी ठरवणार आहेत. प्रसाद कांबळी यांच्या मनातही हे शंभरावं नाटय़संमेलन आपल्याच कारकीर्दीत व्हावं ही मनीषा नसेलच असं नाही.

तर ते असो.

त्याहून सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली बरीच वर्षे राजकारणाचा अड्डा ठरलेली नाटय़ परिषद त्यापासून मुक्त करण्याची! मुख्य म्हणजे मृतप्राय झालेल्या नाटय़ परिषदेस संजीवनी देण्याची! य नाटय़ परिषदेला नवसंजीवनी देण्याचा घाट कै. दामू केंकरे यांच्या नेतृत्वाखाली काही वर्षांपूर्वी घातला गेला होता. त्यांनी सत्तांतरही घडवून आणलं. परंतु लढाई जिंकल्यावर तहात हरण्याच्या मराठी माणसाच्या परंपरेनुसार त्यांनी चुकीच्या माणसाच्या हाती नाटय़ परिषदेची सूत्रं दिली. आणि मग पश्चात्तापाशिवाय त्यांच्या हाती काही उरलं नाही. त्यांचे चिरंजीव विजय केंकरे यावेळी एका पॅनलमधून उभे आहेत. वडलांसारखाच भला माणूस! त्यांना आपल्या वडलांनी केलेली ‘ऐतिहासिक चूक’ दुरुस्त करण्याची संधी आहे. त्यांनी ती जरूर करावी. या साऱ्या धुमश्चक्रीत नाटय़ परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाटय़संकुलाचं काय होणार, हा प्रश्न जीवन – मरणाचा झाला आहे. ते पाडलं तर नाटय़ परिषदेच्या डोक्यावरचं छप्पर जाणार!  ते पुन्हा कधी उभं राहील हे मग प्रत्यक्ष ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. ते उभं करण्याची इच्छाशक्ती आणि धमक असलेलं नेतृत्व सध्या तरी नाटय़ परिषदेच्या आसपास दिसत नाहिये. ते निर्माण होवो, ही प्रामाणिक सदिच्छा!

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 03:02 IST

संबंधित बातम्या