मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये आपण अनेकदा आयटम साँग बघितले आहेत, त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री नृत्य करताना दिसतात. क्वचितप्रसंगी अभिनेत्यांनीही आयटम नंबर केल्याची उदाहरणे बॉलीवूडमध्ये आहेत. मात्र प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽ’ हे भाईटम साँग पाहायला मिळणार आहे. नुकतेच ते समाजमाध्यमावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर पसंती देत ते लोकप्रिय केले आहे.

अभिजित भोसले यांच्या जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेन्मेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात हे भाईटम साँग चित्रित करण्यात आले आहे.

आयटम साँगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम साँगची खासियत म्हणजे शहरातील सगळ्यात मोठय़ा भाईच्या वाढदिवसानिमित्ताने झालेला जल्लोष आणि त्यावर खास भाई स्टाईल नृत्य या गाण्यात बघायला मिळणार आहे.

आजवर प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वाना परिचित आहेत, पण या भाईटम साँगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचे नृत्य चाहत्यांना दिसणार आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे.

आजवर अतिशय सौम्य शब्दांची गाणी लिहिणाऱ्या प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽ’ हे गीत लिहिले असून आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटातील हे गाणे मनोरंजन करणारे असले तरी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट शेतक ऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडणारा व वास्तववादी स्थिती मांडणारा आहे. अतिशय हटके असा हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.