हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटांमधून ‘लय भारी’ अभिनयाची खेळी केल्यानंतर एकीकडे आपला हाच खेळ आणखी प्रभावी करायचा ही जशी जबाबदारी आहे तशीच निर्मात्याच्या भूमिकेतही उतरलेल्या रितेश देशमुखवर सातत्याने चांगले आशयघन चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचेही आव्हान आहे जे तो आवडीने पेलतोय. मात्र या दोन्हीची कसरत सांभाळत असताना वैयक्तिक जीवनात आपल्या दोन्ही मुलांबरोबर वेळ घालवणं रितेशला जास्त आवडतं. पालकत्वासारखी दुसरी चांगली आणि महत्त्वाची भूमिका नाही. माझं व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवन या दोन्ही गोष्टी मी वेगळ्या ठेवल्या आहेत, असं तो स्पष्टपणे सांगतो. ‘बँकचोर’ या चित्रपटानंतर रुपेरी पडद्यावरून अचानक गायब झालेला रितेश ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माता म्हणून प्रेक्षकांसमोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या रूपात ‘फास्टर फेणे’ अशी जाहिरात करत अभिनेता अमेय वाघचे छायाचित्र असलेला ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. भा. रा. भागवतांनी शब्दांतून जिवंत केलेला हा मराठमोळा डिटेक्टिव्ह फास्टर फेणे आता रुपेरी पडद्यावर येतो आहे. रितेशच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ने ‘झी स्टुडिओ’बरोबर या चित्रपटाची निर्मिती केली असून २७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी ‘बालक पालक’, ‘यलो’, ‘लय भारी’सारखे चित्रपट निर्माता म्हणून दिल्यानंतर अचानक डिटेक्टिव्ह चित्रपटाकडे वळण्याचा निर्णय हा जाणीवपूर्वक नव्हता, असं त्यानं स्पष्ट केलं. ‘फास्टर फेणे’ची कल्पना ही दिग्दर्शक आदित्य सरपोतदारची होती. डिटेक्टिव्हवर चित्रपट करायचा आहे हे त्याने सांगितलं होतं; पण त्या वेळी कथा आमच्याकडे तयार नव्हती. भा. रा. भागवतांचा ‘फास्टर फेणे’ हा सत्तरच्या दशकातला आहे. त्यामुळे चित्रपट करताना ते संदर्भ आज २०१७ मध्ये वापरणं योग्य ठरलं नसतं. त्यामुळे आजच्या काळातली कथा लिहिणं गरजेचं आहे हा पहिला विचार होता. त्यानंतर कथा लिहिली गेली आणि मग प्रत्यक्ष कामाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा खऱ्या अर्थाने हा नव्या रूपातला, नव्या ढंगातला ‘फास्टर फेणे’ आणताना काय काय वेगळं करता येईल, याचा विचार सुरू झाला, असं त्याने सांगितलं. गुप्तहेरांच्या कथा कोणाला आवडत नाहीत. त्यामुळे मलाही त्या आवडतात. रहस्यमय कथांचा जॉनरच वेगळा असतो. त्यामुळे मलाही त्या कथा आवडत होत्या; पण तरीही लहानपणी भागवतांचा ‘फास्टर फेणे’ वाचनात आला नव्हता. त्याविषयी ऐकून होतो; पण लहानपणी गोष्टी वाचल्या नव्हत्या. त्यामुळे एक व्यक्तिरेखा म्हणून त्याचा प्रभाव निर्माण होणे वगैरे गोष्टी आपल्या बाबतीत शक्य नव्हतं, असं त्याने मोकळेपणाने सांगितलं. मात्र निर्माता म्हणून जेव्हा ‘फास्टर फेणे’वर चित्रपट करायचा ठरलं तेव्हा जाणीवपूर्वक त्या गोष्टी वाचून काढल्याचेही त्याने सांगितले.

या चित्रपटात अमेय वाघ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट कथा लेखनाच्या प्रक्रियेत मी नव्हतो. खरे तर या चित्रपटाआधी मी कधीच अमेयला भेटलो नव्हतो. त्याच्याबद्दल माहिती होती, पण भेट झालेली नव्हती. आदित्यला मात्र कथा लिहिताना फास्टर फेणे म्हणून केवळ आणि केवळ अमेयचाच चेहरा समोर येत होता. त्याने अमेयविषयी माहिती दिली. त्या वेळी अमेय ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेमुळे प्रसिद्ध झाला होता. आता तर तो सलग नाटकातून काम करतोय. त्याचा ‘मुरांबा’ चित्रपटही हल्लीच प्रदर्शित झाला आहे; पण अमेयने ऑडिशन दिली, काम सुरू के लं. तेव्हा ते फारसं जाणवलं नाही; पण आता जेव्हा मी चित्रपट पाहतो तेव्हा अमेयशिवाय दुसरं कोणी या व्यक्तिरेखेत फिट बसलं नसतं, हे जाणवतं. इतकं त्याने चोख काम केलंय, अशी कौतुकाची पावतीही रितेशने दिली. अभिनेता म्हणून हिंदी आणि मराठी चित्रपटांतून सलग यश मिळवल्यानंतर आता एकापाठोपाठ एक चित्रपट करायची इच्छा उरलेली नाही. एखादी वेगळी भूमिका असेल किंवा विषय आवडला तरच तो चित्रपट करावा, ही जाणीव आता जास्त आहे आणि हे केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर निर्माता म्हणूनही लोकांना काही तरी नवीन आशय पाहायला मिळावा हीच इच्छा मनात असते आणि त्यानुसारच दोन्हीकडे काम करतो आहे, असं त्याने स्पष्ट केलं. ‘व्हिलन’ किंवा ‘लय भारी’ अशी तुम्हाला जेव्हा एक अभिनेता म्हणून ओळख मिळते, तुमच्यासाठी म्हणून भूमिका लिहिल्या जातात तेव्हा खरोखरच खूप आनंद होतो आणि म्हणूनच चांगलं ते करण्याची, देण्याची जबाबदारीची भावना अधिक वाढली असल्याचंही त्याने सांगितलं. आगामी मराठी चित्रपटात तो शिवाजी महाराजांची भूमिका करणार याबद्दल चर्चा सुरू असली तरी याबद्दल अजून तरी फारसं काही सांगण्यास रितेश उत्सुक नाही. त्या संदर्भात अजूनही कथेवर काम सुरू असल्याचे त्याचे म्हणणे आहे. हिंदीतही रितेश लवकरच ‘डबल धमाल’ या चित्रपटातून पुन्हा एकदा अजय देवगण आणि संजय दत्तबरोबर दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on riteish deshmukh
First published on: 24-09-2017 at 03:52 IST