मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर असंख्य चित्रपटांची निर्मिती झाली. मात्र, या चित्रपटांच्या गर्दीत एक चित्रपट गेले ३२ वर्ष अविरतपणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. २३ सप्टेंबर १९८८ साली ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पाहता पाहता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. विशेष म्हणजे आज ३२ वर्ष उलटल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये असलेल्या या चित्रपटाची गोडी यत्किंचितही कमी झालेली नाही. आजही हा चित्रपट आणि यातील कलाकार प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यास यशस्वी आहेत. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आणि त्या भूमिका अजरामर केल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून ते अश्विनी भावे यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केलं. त्यांच्या तुलनेत सिद्धार्थ रे हा नवीन कलाकार होता. मात्र त्यांनीदेखील त्यांच्या भूमिकेला न्याय दिला. सिद्धार्थ रे यांनी या चित्रपटात शंतनू ही भूमिका साकारली होती. त्यामुळेच आज चित्रपटाला ३२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धार्थ रे यांच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर प्रेक्षकांना हसवणारे सिद्धार्थ हे अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. ८ मार्च २००४ साली सिद्धार्थ यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

सिद्धार्थ यांचा जन्म १९ जुलै १९६३ साली एका मराठी- जैन कुटुंबात झाला होता. सिद्धार्थ हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांचे नातू होते. व्ही. शांताराम हे सिद्धार्थची आई चारुशीला रे यांचे वडील होते. ‘अशी ही बनवाबनवी’मधून सिद्धार्थ यांचा चेहरा महाराष्ट्रभरात पोहोचला पण त्याआधीही त्यांनी दोन सिनेमांमध्ये काम केले होते. १९८० मध्ये ‘थोडीसी बेवफाई’ आणि १९८२ ‘मातली किंग’ या सिनेमांमध्ये सिद्धार्थ यांनी काम केले होते. ‘अशी ही बनवाबनवी’नंतर सिद्धार्थने ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ (१९८९) या चित्रपटात त्यांनी अलका कुबल यांच्या पतीची भूमिका पार पाडली होती. ‘चाणी’ या रंजना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर सिद्धार्थ ‘बाजीगर’, ‘परवाने’, ‘वंश’, ‘जानी दुश्मन’, ‘पहचान’ अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केले. २००४ साली प्रदर्शित झालेला ‘चरस’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला ठरला.

सिद्धार्थ यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत असताना अचानक हृदयविकाराने झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने अवघ्या सिनेसृष्टीने धक्का बसला. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करत एका चांगल्या अभिनेत्याला सिनेसृष्टी मुकल्याची भावना व्यक्त केली होती. १९९९ साली सिद्धार्थ हे दाक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत लग्नबंधनात अडकले. त्यांना सोनिया आणि शिशया नावाच्या दोन मुली आहेत. सिद्धार्थ यांचे निधन झाले तेव्हा या दोघीही चार वर्षांपेक्षा लहान वयाच्या होत्या. शांतीप्रिया यांनी तामिळ, तेलुगू तसेच हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. ‘फुल और अंगार’, ‘मेहेरबान’, ‘मेरा सजना साथ निभाना’, ‘वीरता’, ‘अंधा इतंकाम’, ‘हॅमिल्टन पॅलेस’, ‘सौगंध’, ‘इक्के पे इक्का’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती यासारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर शांतीप्रिया यांनी काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashi hi banvabanvi everything you want to know about siddharth ray as shantau ssj
First published on: 23-09-2020 at 08:54 IST