अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार मराठी, हिंदी, चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.

४ ऑक्टोबर रोजी पुरस्काराचं वितरण

४ ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि ५१ हजार रुपये रोख असं पुरस्कारचं स्वरुप आहे. अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ हे दोघंही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नाट्य परिषदेच्या वतीने केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या औचित्याने पुरस्काराचं आयोजन केलं जातं. पुरस्कार सोहळ्यानंतर निवेदक विघ्नेश जोशी हे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

पांडू हवालदार मधून अशोक सराफ आले आणि..

अशोक सराफ हे १९७० च्या दशकापासून मराठी रंगभूमी, चित्रपट आणि त्यानंतर मालिका विश्वातही कार्यरत आहेत. त्यांनी आजवर मराठी, हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेलं. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली ‘माईलस्टोन’ भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका आहे. तसंच ‘पांडू हवालदार’ या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला. तसंच ‘राम राम गंगाराम’ या दोन चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांच्यासह त्यांनी भूमिका केल्या. त्या दोन सिनेमांमधला अभिनयही लोकांच्या लक्षात आहे

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी हिट

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. तसंच सचिन, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अशी ही बनवा बनवी हा चित्रपट आजही लोकांना तेवढाच खळखळून हसवतो यात शंका नाही. धमाल बाबल्या गणप्याची, अफलातून, एका पेक्षा एक, धरलं तर चावतंय, चंगू-मंगू असे एकाहून एक सरस चित्रपट अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने महाराष्ट्राला हसवलं आहे. अजय देवगणच्या सिंघममधला निवृत्तीकडे झुकलेला अशोक सराफ यांनी साकारलेला हवालदारही लोकांच्या लक्षात आहे. उत्तम टायमिंग, मर्म विनोदातून लोकांना हसवणं आणि वेळेला डोळ्यांतून पाणी काढण्याचीही कला अशोक सराफ यांच्या अभिनयात आहे. कळत नकळत सिनेमात त्यांनी साकारलेला छोटू मामा त्यांच्या अभिनयाचा हळवा कोपरा दाखवून जातो. बहुरुपी सिनेमातली त्यांची भूमिका मनावर एक आघात करुन जाते. वजीर चित्रपटातला बाबासाहेब मोरे हा मुख्यमंत्री बेरकी राजकारणी कसा असावा ते दाखवून जातो. त्यामुळे अशोक सराफ यांचं नाव घेतल्याशिवाय मराठी सिनेसृष्टी अपूर्ण आहे यात शंकाच नाही.