संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाला विरोध अजूनही कमी झालेला नाही. चितौडगढ किल्ल्यावरील पद्मिनी महालाबाहेर असलेला शिलालेख झाकून टाकण्यात आला आहे. अल्लाउद्दीन खिल्जीने राणी पद्मिनीला पाहिल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे. त्यामुळे राजपूत करणी सेनेने दिलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाने शिलालेख झाकला.

जोधपूर येथील विभागीय कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांच्या परवानगीने हा शिलालेख झाकण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय पुरातत्व विभागाने हा शिलालेख लावला असून पद्मिनी महालात अलाउद्दीन खिल्जीने राणी पद्मिनीला पाहिले होते, असा उल्लेख या शिलालेखावर करण्यात आला आहे. करणी सेनेच्या सदस्यांनी या शिलालेखावर आक्षेप घेतला असून हा शिलालेख तात्काळ हटवण्यात यावा अशीही मागणी केली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

वाचा : खासगी गोष्टींची चर्चा होत असल्यामुळे बोलावं लागलं- माहिरा खान

हा सगळा प्रकार इतिहासाला धक्का पोहोचवणारा असल्याने केवळ शिलालेखच नव्हेत तर असा उल्लेख ज्या ज्या पुस्तकांमध्ये आहे, तिथूनही तो हटवण्यात यावा अशी मागणी, जौहार सेवा संस्थानचे प्रवक्ते लोकेंद्र सिंह चुंडावत यांनी केली आहे.